राज्यात पुढील निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या कुबडय़ा फेकून देण्यासाठी ‘शत-प्रतिशत भाजप’चा कानमंत्र अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेशी युती तोडल्यामुळेच आम्हाला आमची ताकद समजली, असे प्रतिपादन केले. तर मनासारखे जागावाटप झाले, तरच युती, अन्यथा नाही, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठणकावले. त्यामुळे आता भाजपच्या शिडात पुन्हा स्वबळाची हवा भरू लागली असून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या परिस्थितीत शिवसेनेबरोबरची युतीची वाटचाल किती काळ चालणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वबळावर भाजपची सत्ता आणा!
जागावाटप योग्य झाले, तरच युती टिकेल
युती तुटल्याने भाजपला स्वत:ची ताकद समजली
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडल्याने भाजपला स्वबळावर पुरेशी तयारी करता आली नाही. पुरेसे संख्याबळ पदरी न पडल्याने नाइलाजाने शिवसेनेची मदत घ्यावी लागल्याचे शल्य अजूनही भाजप नेत्यांच्या मनात आहे. या पाश्र्वभूमीवर अमित शहा यांनी या परिषदेत युती किंवा शिवसेनेचा उल्लेखही केला नाही. उलट आपण हरलेल्या प्रत्येक जागी पक्षाची ताकद वाढवून पुढील निवडणुकीत विजयश्री खेचून आणावी, असा निर्धार करण्याचे आवाहन शहा यांनी केले. त्यामुळे पुढील निवडणुकीत वारे कोणत्या दिशेने वाहणार आहेत, याचेच संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही भाजपच्या मनाप्रमाणे जागावाटप झाले नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती न करता स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचे बाहू स्वबळाने फुरफुरू लागल्याने शिवसेनेला नरमाईची भूमिका घेण्यास भाग पाडले जाणार असल्याचे स्पष्ट आहे.