माथेरानमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश हरित लवादाने दिला आहे. या निर्णयानंतर स्थानिक प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई तात्काळ थांबवावी या मागणीसाठी आज माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

अनधिकृत बांधकामावरील कारवाई तात्काळ थांबवावी या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय संघर्ष समितीने दिलेल्या बंदच्या हाकेला स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माथेरान मधील हॉटेल व्यवसायिक, अश्वपाल संघटना, हातगाडी संघटना, टॅक्सी संघटना आणि व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे माथेरानमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बाजरपेठ बंद होती. पर्यटकांचे चांगलेच हाल झाले.

माथेरानमध्ये २००३ नंतर नवीन बांधकामांना बंदी आहे. पर्यावरणीयदृष्टय़ा अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून हा परिसर घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीही स्थानिकांनी २००३ नंतर या परिसरात अनेक बांधकामे केली आहेत, त्यापकी ३४ बांधकामे काढून टाकण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. यानुसार अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

माथेरान शहराचा विकास आराखडा २००३ मध्ये मंजूर होणे अपेक्षित होते, मात्र २०१७ उजाडले तरी नवीन विकास आराखडय़ाला मंजुरी मिळालेली नाही. दुसरीकडे संवेदनशील क्षेत्र असल्याने माथेरानमध्ये नवीन बांधकामांना परवानगी मिळत नाही, अशा दुहेरी कोंडीत माथेरानकर अडकले होते. या कालावधीत स्थानिकांनी बांधकामे केली होती. ही सर्व बांधकामे अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तातडीने थांबवावी आणि शहराच्या विकास आराखडय़ाला मंजुरी मिळावी, अशी मागणी स्थानिक संघर्ष समितीने केली आहे. कारवाई थांबली नाही तर बेमुदत बंद आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने या वेळी दिला.