डहाणूतील चिकूसह इतर शेतमालाच्या वाहतुकीसाठी प्रयत्न; गाडी दररोज सोडण्याची मागणी

पालघर : डहाणू येथून चिकू वाहून नेणाऱ्या किसान एक्स्प्रेस गाडय़ांना शेतकरी व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  या गाडय़ा दररोज सुरू ठेवण्याची मागणी येथील बागायतदारांनी पश्चिम रेल्वेकडे  केली आहे. २० डब्यांच्या या गाडीमधील सहा डबे  हे डहाणूसाठी असून संपूर्ण गाडी डहाणू येथून निर्गमित करण्यासाठी  चिकूला इतर शेतमालाची जोड देण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे  म्हणणे आहे.

पश्चिम रेल्वेने ‘किसान एक्स्प्रेस’च्या माध्यमातून फळ व शेतमालाची वाहतूक करण्यासाठी ५० टक्के सवलती विशेष योजना कार्यान्वित केली.२० डब्यांच्या प्रत्येक मालगाडीतील सहा डबे हे डहाणूतील  ६० टन चिकूच्या वाहतुकीसाठी ठेवण्यात आले.  आजवर अशा दहा विशेष किसान एक्स्प्रेस गाडय़ा आठवडय़ातून तीन दिवस डहाणू ते आदर्शनगर (दिल्ली) दरम्यान धावत आहेत.  या महिन्यांत आणखी सहा गाडय़ांची आखणी करण्यात आली आहे.

विशेष किसान एक्स्प्रेस गाडीसाठी किमान २० मालवाहू डब्यांमध्ये नोंदणी आवश्यकता आहे. डहाणू येथे सहा डबे तर उर्वरित डबे उद्धवाडा व अमलसाड येथे जोडण्यात येतात. डहाणू येथील बागायतदारांकडून अशी दररोज विशेष मालगाडी सोडण्याची मागणी पश्चिम रेल्वेकडे करण्यात आली आहे. मात्र त्या अनुषंगाने गुजरात राज्यातील शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

डहाणू येथून सहा बोगीमध्ये साठ टन चिकूची वाहतूक होत असून गाडी सुटण्याच्या दिवशी त्यापेक्षा अधिक चिकू तोड झाल्यास व्यापाऱ्यांना उर्वरित माल ट्रकमधून पाठवणे भाग पडत आहे. त्यासाठी डहाणू ते थेट दिल्ली अशी गाडी सोडण्यात यावी अशी मागणी होत आहे. डहाणू येथून  चिकूसह इतर शेतमाल म्हणजेच मिरची, भोपळी मिरची, टोमॅटो व इतर भाजीपाला यांचा समावेश केल्यास  ही मागणी पूर्णत्वात येणे शक्य आहे. यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.

सध्या एक रुपये ९० पैसे प्रति किलो इतक्या माफक दराने चिकू दिल्लीपर्यंत पोहोचविला जात आहे.  किसान एक्स्प्रेस गाडय़ांची आठवडय़ाला संख्या वाढवण्यासाठी इतर शेतमाल व व्यापाऱ्यांच्या प्रतिसाद वाढणे अपेक्षित आहे.

गुजरात व्यापाऱ्यांवर अवलंबून

गुजरातमध्ये दिल्ली व इतर भागात शेतमाल व फळ पाठवण्यासाठी शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी अधिक संख्येने कार्यरत आहेत.  गुजरात येथून आवक होणाऱ्या शेतमालावर गाडी सोडण्याचे वेळापत्रक अवलंबून आहे. डहाणू येथून फळे व भाजीपाला वाहतुकीवर मर्यादा येत आहेत.  पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन संपूर्ण २० डब्याची मालगाडी सोडण्यासाठी  प्रयत्न करायला हवेत. या दृष्टीने कृषी विभाग शेतकरी व बागायतदारांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजीपाल्याचा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. डहाणू तालुक्यातून दररोज दहा ते बारा ट्रक भाजीपाला उत्तरेकडील राज्यात जात असतो. या मालाची जोड चिकू रेल्वे वाहतुकीला झाल्यास येथील शेतमाल जलद गतीने व किफायतशीर किमतीने दिल्ली येथील बाजारपेठेत पोहचू शकेल, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.