कॉ. गोविंद पानसरे यांचे हत्येच्या निषेधार्थ डाव्या संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील व्यवहार बंद राहिले. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. आरपीआयच्या (आठवले गट) वतीने पानसरे यांच्या खुनाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
    भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोिवद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला. उपचार सुरु असताना मुंबई येथे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर शहरातील सर्व व्यवहार बंद होते. जिल्हाच्या अनेक भागात बंदसदृश स्थिती होती. तर शनिवारी पानसरे यांच्या खुनाच्या निषेधार्थ डाव्या संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या हाकेला कोल्हापुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आजही शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शहरातील व्यापारी पेठा असलेल्या भागात एकही दुकान सुरु नव्हते. सर्वत्र शांतता जाणवत होती. बंदची दखल घेऊन शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. १२ वी परीक्षा असल्याने बंदसाठी रविवारचा दिवस निवडल्याचे संयोजकांनी सांगितले.
दरम्यान, आरपीआयच्या (आठवले गट) वतीने पानसरे यांच्या खुनाच्या निषेधार्थ रविवारी दाभोलकर कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चौकाच्या सभोवती कडे करुन वाहतूक रोखून धरली. मध्यवर्ती बस स्थानकाच्या जवळच दाभोळकर कॉर्नर असल्यामुळे रास्ता रोकोमुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. पानसरे यांच्या हल्लेखोरांना पकडून शिक्षा व्हावी, पानसरे अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या.