राज्यस्तरीय पॉवरलिफटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या गोरेगाव येथील वैभवी पाटेकर या १९ वर्षीय खेळाडू युवतीने तलावात उडी घेवून आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसले तरी घरच्या आर्थिक परीस्थितीमुळे तिने हे पाऊल उचलले असावे असा कयास आहे.
वैभवी गोरेगावातील भरवनाथ नगर परीसरात आपल्या कुटुंबासह रहात होती. मागील दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती. तशी तक्रार तिची आई ज्योतिका पाटेकर यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात केली होती . दोन दिवस तिचा शोध सुरू असताना. मंगळवारी रात्री गोरेगाव येथील विष्णू तलावात तिचा मृतदेह आढळून आल्याने सर्वानाच धक्का बसला . पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने तिचा मृतदेह बाहेर काढला . आज दुपारी गोरेगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गोरेगावकर नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .
वैभवीच्या या अकस्मात मृत्यूमुळे गोरेगाव परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वैभवी ही गोरेगाव येथील व्यायामशाळेत पॉवरलिफटींगचा सराव करीत असे . काही दिवसांनी तिची आईदेखील यात सहभागी झाली . दोघींनी विविध स्पर्धामध्ये सहभाग घेतला . गेल्यावर्षी राज्यस्तरीय वैभवीने सुवर्णपदक मिळवले होते . ५७ किलो वजनी गटात २३० किलो वजन उचलून ती पहिली आली. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा गाजवण्याचा मानस तिने व्यकत केला होता. घरची परीस्थिती बेताचीच असताना दोघींनीही आपला सराव सुरू ठेवला होता . लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठासमोर दाबेली व अन्य खाद्यपदार्थ विकून त्या आपल्या कुटुंबाचा चरीतार्थ चालवत होत्या. मात्र वैभवीच्या अशा अचानक जाण्याने तिची आई ज्योतिका या मात्र पार कोसळल्या आहेत
वैभवी अतिशय कणखर स्वभावाची होती. तिच्या बोलण्यात नेहमीच आत्मविश्वास असायचा . वडील आजारी असल्याने ती त्यांची रिक्षादेखील चालवत असे. सवा्रंशी मिळून मिसळून वागणारी , सतत हसतमुख आनंदी राहणारया वैभवीने हे टोकाचे पाऊल का बरे उचलले असा प्रश्न अनेकांना सतावतो आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 1:03 am