10 August 2020

News Flash

रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचा वनवास सुरूच

उद्घाटनानंतरही रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचा वनवास सुरूच आहे. कोटय़वधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले नेऊली अलिबाग येथील क्रीडा संकुल वापराविना पडून आहे.

उद्घाटनानंतरही क्रीडा संकुल वापराविना पडून

उद्घाटनानंतरही रायगड जिल्हा क्रीडा संकुलाचा वनवास सुरूच आहे. कोटय़वधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले नेऊली अलिबाग येथील क्रीडा संकुल वापराविना पडून आहे. देखभालीअभावी संकुल परिसरात सध्या रानटी झुडपांचे साम्राज्य पसरले असल्याचे सध्या पाहायला मिळते.

जिल्हा क्रीडा संकुल खेळाडूंसाठी उपलब्ध होण्यासाठी रायगडकरांना तब्बल तीन दशकांची वाट पाहावी लागली होती. हे क्रीडा संकुल पूर्ण झाले म्हणून यावर्षी जून महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही हे संकुल वापराविना पडून आहे. त्यामुळे उद्घाटनानंतरही क्रीडा संकुलाचा वनवास सुरूच आहे.

जिल्हा क्रीडा संकुलासाठी १९८५ साली आलिबाग तालुक्यातील नेहुली येथील १० एकर जागा संपादित करण्यात आली. त्यानंतर या जागेवर संरक्षण िभत बांधण्याव्यतिरिक्त कोणतेही काम झाले नव्हते. २००१ सालच्या क्रीडा धोरणानुसर राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात जिल्हा क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. २००३ साली काढण्यात आलेल्या राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार रायगड जिल्हा क्रीडा संकुलासाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यात ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, इंडोअर क्रीडा प्रकारांसाठी हॉल, विविध खेळांची मदाने, तरणतलाव, व्यायामशाळा, प्रेक्षागॅलरी यांचा समावेश होता. दोन टप्प्यांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते.

पहिल्या टप्प्याच्या कामाला २००५ साली प्रत्यक्ष सुरुवात झाली. यात प्रामुख्याने बहुद्देशीय इंनडोअर क्रीडा संकुल, व्यायामशाळा, प्रेक्षागृह आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि खेळाडूंच्या राहण्यासाठी वसतिगृह व्यवस्था यांचा समावेश होता. २००९ साली हे काम पूर्ण झाले. तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या इमारतींचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणानंतर क्रीडा संकुल परिसराचा वापर सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु पाणी नसल्यामुळे त्याचा वापर झाला नाही.

इनडोअर संकुल तयार झाले असले तरी आऊटडोअर मदानांची कामे अद्याप बाकी होती. यात प्रामुख्याने फुटबॉल मदान, ४०० मीटर धावण्याचा ट्रॅक, कबड्डी व खो -खो मदान, लॉन टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, तरणतलाव, क्रिकेटची खेळपट्टी या कामांचा समावेश होता. मात्र त्यासाठी निधी कमी पडत असल्याचे लक्षात आले. राज्य शासनाने या क्रीडा संकुलासाठी आणखी ४ कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले. २०११पासून दुसऱ्या टप्प्याचे म्हणजेच आऊटडोअरचे काम सुरू करण्यात आले. २०१४ अखेपर्यंत यातील काही मदानांची तसेच तरणतलावाची कामे पूर्ण झाली. मात्र क्रीडा संकुलासाठी लागणारे पाणी आणि वीजपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता झालीच नाही.

क्रीडा संकुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असतानाच, तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनीता रिकामे आणि जिल्हा क्रीडा समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी यांनी जून महिन्यात या क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पाडून घेतला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकुलाचे लोकार्पणही केले. मात्र पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा नसल्याने हे सुसज्ज क्रीडा संकुल वापराविना पडून राहिले. देखभालीअभावी आज क्रीडा संकुल परिसरात रानटी झाडांचे वास्तव्य पाहायला मिळते.

वास्तविक पाहता पाणी आणि वीज यासारख्या सुविधांच्या पूर्ततेशिवाय क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्याची गरजच नव्हती. मात्र तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी यांना वैयक्तिक कारणांसाठी दोन वर्षांसाठी रजेवर जायचे होते. तर जिल्हा क्रीडा परिषदेचे प्रमुख जिल्हाधिकारी यांची बदली झाली होती. आपल्याच कार्यकाळात क्रीडा संकुलाचे लोकार्पण व्हावे म्हणून दोघांनी हा कार्यक्रम जून महिन्यातच उरकून घेतला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनभिज्ञ ठेवण्यात आले.

क्रीडा अधिकारी कार्यालय भाडय़ाच्या जागेत

क्रीडा संकुलाचे लोकार्पण झाले असले तरी नेऊली हे ठिकाण अलिबाग मुख्यालयापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जाणे- येणे अधिकारी कर्मचारी आणि कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्यांसाठी अडचणीचे ठरते. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय आजही भाडय़ाच्या जागेत कार्यरत आहे. भाडय़ापोटी वर्षी लाखो रुपयांची रक्कम कार्यालयाकडून खर्च केली जाते. हे कार्यालय शासकीय इमारतीत स्थलांतरित केल्यास क्रीडासंकुलाची देखभाल दुरुस्तीचे कामही योग्य प्रकारे होऊ शकेल आणि शासकीय निधीचा अपव्ययही टळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2015 3:27 am

Web Title: sports complex remain idle after inauguration in raigad district
Next Stories
1 जि.प. वर्तुळात जेवणावळींना सुरुवात
2 ग्रामसभेतच विरोधकावर पिस्तूल रोखले
3 महायुतीची ४१ जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Just Now!
X