प्रदीप नणंदकर

सोयाबीन हे पावसाचा ताण व अतिवृष्टी दोन्ही सहन करणारे पीक म्हणून शेतकरी त्याकडे पाहत होते. गेली अनेक वर्षे पाण्यात असलेले सोयाबीनही पाणी ओसरल्यानंतर सहसा त्याला कोंब फुटत नसत. मात्र, या वर्षी उभ्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटू लागल्याने शेतकरी हादरले आहेत. या प्रकरणी कृषी शास्त्रज्ञही चिंतेत आहेत.

लातूर जिल्ह्य़ातील देवणी तालुका, उद्गीर तालुका व निलंगा तालुका या तालुक्यातील अनेक मंडळांत अतिवृष्टी झाल्याने काढणीला आलेले मूग, उडीद तर हातचे गेलेच, शिवाय सोयाबीन व तूर या खरीप हंगामातील दोन्ही पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तूर आडवी पडली आहे, तर सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटू लागले आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले,की राज्यातील विविध कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले सुमारे ४० वाण सोयाबीनचे आहेत. याशिवाय शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने अनेक वाण विकसित केले आहेत. शिवाय खासगी कंपन्या आहेत. या वर्षी सोयाबीनला कोंब फुटण्याच्या घटना घडल्याचे वृत्त समजल्यानंतर ही बाब अनाकलनीय असल्याचे दिसते आहे. कारण मूग व उडीद ही खरीप हंगामातील पिके पावसासमोर फारसे टिकाव धरत नाहीत व अतिपाऊस झाला तर या पिकाची मोठी नासाडी होते. मात्र, सोयाबीन तुलनेने अधिक क्षमतावान पीक आहे. काढणीला पीक आल्यानंतरही ते पीक जर उभे असेल व पावसात जरी भिजले तरी पाऊस ओसरल्यानंतर त्यातील आद्र्रतेचे प्रमाण वाढते. मात्र, कोंब फुटण्याचे प्रकार फार कमी घडतात. मात्र, या वर्षी वाळलेल्या शेंगांव्यतिरिक्त हिरव्या शेंगांनाही कोंब फुटण्याचे प्रकार समोर येत असून नेमके कोणते वाण याला बळी पडते आहे, याचा अभ्यास केला पाहिजे व त्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सांगितली पाहिजे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा चमू या कामात संशोधन करेल व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल, असे ते म्हणाले.

परभणी कृषी विद्यापीठातील सोयाबीन पिकावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी म्हेत्रे म्हणाले,की भारतातील सोयाबीनचे पीक हे ९० ते १०० दिवसांचे आहे. या वर्षी १५ ते २० जूनच्या दरम्यान अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या. जमिनीतील ओल पुन्हा राहील की नाही याच्या चिंतेमुळे शेतकरी पेरणी करतात. उशिरा पेरणी केली तर काढणीच्या वेळी येणाऱ्या परतीच्या पावसाचा फारसा परिणाम होणार नाही, असे कृषी विभागाने सांगितले तरी शेतकरी जमिनीतील ओल बघूनच पेरणी करतात. या वर्षी पेरणीनंतर चांगला पाऊस झाला. पिकाची थोडी वाढ झाली व त्यानंतर पावसाने काही दिवस ताण दिला. तो ताण सोयाबीनने सहन केला. मात्र, गेले १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात दररोज पाऊस आहे. पेरणीनंतर बऱ्याच ठिकाणी ८० ते ९० दिवस पूर्ण होत आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरल्यानंतर काढणीच्या वेळी पाने पिवळी पडतात व शेंगा परिपक्व व्हायला सुरुवात होते. या कालावधीत तापमान ३० ते ३५ सेल्सिअसपेक्षा अधिक लागते व हवेतील आद्र्रतेचे प्रमाण ४० टक्क्य़ांपेक्षा कमी असण्याची गरज आहे. यावर्षी नेमके उलटे झाले. या कालावधीत तापमानाचे प्रमाण २० ते २५ सेल्सिअस इतके असून आद्र्रतेचे प्रमाण १०० टक्क्य़ांच्या आसपास आहे. त्यामुळे परिपक्व होत असणाऱ्या सोयाबीनच्या शेंगातील बियाला कोंब फुटू लागले आहेत. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हवामानातील बदलामुळे या बाबी घडत आहेत. आता यावर औषधी फवारणीही शक्य नाही. कारण पिकामध्ये जाता येत नाही. शिवाय ही महागडी फवारणी परवडतही नाही. पावसाने उघडीप दिली व तापमान वाढले तर आहे त्या स्थितीतील सोयाबीनची कापणी करून त्याची लवकरात लवकर रास करून ते पीक हाती घ्यावे लागेल. यात शेतकऱ्याचे थोडेबहुत नुकसान होईल. मात्र, सध्या तरी हाच उपाय आहे, असे ते म्हणाले.

खरीप हंगामातील गेल्या २० वर्षांपासून हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते व त्याचा पेरा एकूण खरिपाच्या क्षेत्राच्या ८० टक्के इतका आहे. मुळातच दरवर्षी उत्पादकता कमी होते आहे. या वर्षी चांगला पाऊस पडल्याने चांगले पीक येईल, ही आशा होती. मात्र, परतीच्या पावसाने घात केला असून आणखीन महिनाभर परतीचा पाऊस टिकेल, असा अंदाज असल्याने शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहे.