वाळू माफियांविरोधात कारवाईसाठी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांची संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. वाळूचा अवैध उपसा वाढला असल्याने शहराच्या सर्व रस्त्यांवर वाळू भरलेल्या मोटारींची तपासणी होणार आहे. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक किंवा उपसा होत असेल तर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सोमवारी सांगितले.
जिल्ह्यातील ३६ वाळूपट्टय़ांचे लिलाव करण्यात आले. मात्र, परवानाधारक ठेकेदार किती वाळू उपसतात याकडे लक्ष देण्यासाठी भरारी पथके गठित केली आहेत. वाळू उपसा करणाऱ्यांकडून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. आता या पथकात पोलिसांचा समावेश केला आहे.
शहरात वाळू माफियांचे मोठे जाळे आहे. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी ही पथके पठण, बीड, नगर, जळगाव रस्त्यावर वाहनांची नाकेबंदी करून वाहनांमधील भार तपासतील. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. ज्या वाहनातून वाळूवाहतूक होईल, त्या वाहनधारकाजवळ ठेकेदाराची बारकोडची पावती बंधनकारक केली आहे. पावतीवर किती ब्रास वाळू आहे, याची माहिती नमूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, पठण येथील नायगाव येथील वाळू ठेका रद्द करण्यात आला. बनावट पावत्या तयार केल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या वाळू पट्टय़ाचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. संयुक्त पथकांमुळे अवैध वाळू उपसा कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला. प्रत्येक तहसील स्तरावर तीन पथके स्थापन करण्यात येणार आहेत.