औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारीची पद्धत अभ्यासण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केले जाणार आहे. सध्या अशा पद्धतीचे काम केवळ दोन पोलीस हवालदार करतात. त्यामुळे तपास यंत्रणेला गुन्हेगारांच्या कार्यशैलीचे विश्लेषण करणे अवघड होऊन बसले आहे. यावर मात करण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात येणार असून, पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे.
प्रत्येक गुन्हय़ाची अलिखित कार्यपद्धती असते. काही वेळा संघटितपणे गुन्हा करताना वापरली जाणारी भाषा आणि गुन्हय़ाची पद्धतही सारखीच असते. ही पद्धत पोलीस दप्तरी नोंदविण्यासाठी काही वर्षांपूर्वी पोलीस दलात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असे. गेल्या २० वर्षांत या पथकातील कर्मचारी सेवानिवृत्त होत गेले आणि आता केवळ दोन कर्मचाऱ्यांवर हे काम सुरू आहे. गुन्हेगारांची माहितीही नीटशी उपलब्ध नसते. त्यामुळेही अडचणी येतात. पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग यांनी नव्याने हे पथक अधिक सक्षम करण्याचे ठरविले आहे. त्यांना आवश्यक त्या प्रमाणात संगणक उपलब्ध करून देणे व अन्य साहित्य दिल्यास ही शाखा नीट काम करेल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वाटते. ज्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे, अशांची छायाचित्रे व त्यांच्या कामाची पद्धत सध्या एका नोंदवहीत आहे. ज्या आधारे गुन्हा घडल्यानंतर त्यातील पीडित व्यक्तीला ते छायाचित्र दाखविले जाते. मात्र, ही पद्धत फारशी उपयोगाची नाही. त्यात आणखीन सुधारणेस वाव आहे. ती लवकरच केली जाईल, असे पोलीस आयुक्त सिंग यांनी सांगितले.