पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवार (१ मार्च) पासून सुरू होत असून विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा कक्षात उपस्थित राहणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ५० हजारांनी घट झाली आहे.

राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले या वेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यंदा १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ५० हजार ५४० ने घट झाली आहे.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण केले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करू नयेत. उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी त्यावर बारकोड छापण्यात आले आहेत, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

अखेरची संधी; पहिली परीक्षा

यंदाची दहावीची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अखेरची संधी आहे. तर नव्या अभ्यासक्रमाची ही पहिलीच परीक्षा आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी गणित (भाग १ आणि भाग २) आणि इंग्रजी (द्वितीय/तृतीय भाषा) विषयांसाठी बहुसंची प्रश्नपत्रिकांऐवजी एकच प्रश्नपत्रिका असेल. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जुन्या पद्धतीने बहुसंच प्रश्नपत्रिका असेल.

१४९ तृतीयपंथीय विद्यार्थी?

राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी २३६ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती दिली होती. मात्र, खरोखरच एवढे विद्यार्थी आहेत, की अर्ज भरताना चूक झाली याची माहिती घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले होते. तसाच काहीसा प्रकार दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही झाला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १४९ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, त्यांचीही खातरजमा केली जाणार आहे.राज्य मंडळाने अपंग तीन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विशेष पद्धतीने साहाय्य घेण्यास मुभा दिली आहे. त्यातील एका विद्यार्थी संगणकाच्या साहाय्याने परीक्षा देईल, तर दोन विद्यार्थ्यांना दुभाषी आणि वाचनासाठी अन्य व्यक्तीची मदत दिली जाईल.

मुंबई विभागातून साडेतीन लाख विद्यार्थी

मुंबई :राज्यातील सर्वाधिक परीक्षार्थीची नोंद मुंबई विभागातून होते. यंदा विभागातील ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

पुस्तके, मूल्यमापन आणि परीक्षा पद्धतीतील बदल यांमुळे यंदा दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांना काहीशी आव्हानात्मक वाटत आहे. तोंडी परीक्षांची पद्धत बंद करून यंदा १०० गुणांची परीक्षा होणार आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा राज्य मंडळाच्या समुपदेशकांचे संपर्क क्रमांक खणखणत आहेत.

शुक्रवारपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून प्रथम भाषेपासून परीक्षेची सुरुवात होणार आहे. यंदा मुंबई विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड जिल्हा आणि मुंबई शहराचा समावेश होतो.

मुंबई शहराच्या पश्चिम भागातून ६७ हजार २८४ विद्यार्थी, उत्तर विभागातून ५२ हजार २४७ विद्यार्थी, दक्षिण विभागातून ३५ हजार १५२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ठाणे जिल्ह्यतून १ लाख २१ हजार ४४१, पालघर जिल्ह्यातून ६७ हजार ७६२, रायगडमधून ३९ हजार ४३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षी परीक्षांमधील गैरप्रकार, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना विभागात घडल्या होत्या. यंदा त्या पाश्र्वभूमीवर विभागीय मंडळाने अधिक दक्षता घेतली आहे. विभागात ९९९ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

विभागीय मंडळनिहाय हेल्पलाइन क्रमांक

पुणे – ९४२३०४२६२७

नागपूर – (०७१२) २५६५४०३, २५५३४०१

औरंगाबाद – (०२४०) २३३४२२८, २३३४२८४

मुंबई – (०२२) २७८९३७५६, २७८८१०७५

कोल्हापूर – (०२३१) २६९६१०१, २६९६१०२, २६९६१०३

अमरावती – (०७२१) २६६२६०८

नाशिक – (०२५३) २५९२१४३

लातूर – (०२३८२) – २५१६३३

कोकण – (०२३५२) २२८४८०

विद्यार्थ्यांच्या संख्येत एवढी घट का झाली, याचे नेमके कारण सांगता येणार नाही. त्याबाबत स्वतंत्रपणे माहिती घ्यावी लागेल.

– डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य मंडळ