Maharashtra SSC 10th result 2018: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काही तासात जाहीर होणार आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ आज विद्यार्थ्यांना मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या सा-यामध्ये आज ख-या अर्थाने निकाल लागणार आहे तो म्हणजे पेपर फुटीप्रकरणी दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांचा.
मार्च महिन्यामध्ये झालेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये अनेक पेपरफुटीची प्रकरणे समोर आली. याप्रकरणी मुंबईतील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवरुन एकूण ५४ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. यापैकी ३६ विद्यार्थीनी कॉपी करताना आढळले होते. तर १७ विद्यार्थ्यी पेपरफुटी प्रकरणी दोषी आढळले होते. त्यामुळे पेपरफुटी केलेल्या १७ विद्यार्थ्यांच्या शिक्षेची सुनावणी आज विभागीय मंडळाकडून करण्यात येणार आहे.
पेपरफुटी केलेल्या १७ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीमध्ये या विद्यार्थ्यांनी पेपर परीक्षेपूर्वी फोडल्याची कबूली दिली होती. त्याबरोबरच त्यांना मदत करणा-या शिक्षकांची नावेही सांगितली होती. विद्यार्थ्यांच्या याच जबाबावरुन त्यांना दोषी ठरविण्यात आले होते.मात्र त्यांना त्यावेळी शिक्षा सुनावण्यात आली नव्हती.
मुंबईतील विभागातील अंबोली, साकीनाका आणि टिटवाळा पोलीस ठाण्यामध्ये पेपरफुटीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी इतिहास, विज्ञान,समाजशास्त्र, माहिती आणि तंत्रज्ञान या विषयाचे पेपर परीक्षा सुरु होण्यापूर्वी काही तास आधीच व्हॉट्सअॅपवर फोडण्यात आले होते. त्यामुळे विभागीय मंडळ आज या विद्यार्थ्यांविरोधात कडक शिक्षा सुनावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या विषयी विभागीय मंडळाकडे विचारणा केली असता, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपरफुटीप्रकरणी दोषी आढलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षेची सुनावणी करण्यात येऊ शकते असे सांगण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 8, 2018 11:15 am