राज्यात दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांचा कलमापन आणि अभिक्षमता चाचणीचा निकाल राज्य मंडळाने गुरुवारी जाहीर केला. त्यात सात कल क्षेत्रांपैकी गणवेशधारी सेवा आणि ललित कला या क्षेत्रांकडे विद्यार्थांचा सर्वाधिक कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. गणवेशधारी सेवेत १९.३ टक्के विद्यार्थी, तर ललित कला क्षेत्रात १७.७ टक्के विद्यार्थांना रस आहे.

विद्या प्राधिकरण आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या सहकार्याने राज्यातील २२ हजार ४७८ शाळांतील १५ लाख ७६ हजार ९२६ विद्यार्थांची कलमापन आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात आली. त्यात कृषी, कला-मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य आणि जैविक विज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रातील विद्यार्थांचे कल जाणून घेण्यात आले. विद्यार्थांना या चाचणीचा निकाल १ मे रोजी www.mahacareermitra.in या संके तस्थळावर दुपारी एक वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गेल्या वर्षीही विद्यार्थांचा सर्वाधिक कल गणवेशधारी सेवांकडे होता. यंदाही गणवेशधारी सेवांचे विद्यार्थांमध्ये आकर्षण असल्याचे स्पष्ट झाले. २० टक्के मुलांचा पहिला कल गणवेशधारी सेवा, १९.८ टक्के मुलींचा कल ललित कला या क्षेत्राकडे असल्याचे दिसून येते. तर
१६.८ विद्यार्थांनी वाणिज्य शाखेला दुसरे प्राधान्य दिले आहे.  राज्य मंडळाच्या नऊ विभागांपैकी ६ विभागांमध्ये गणवेशधारी सेवा आणि २ विभागांमध्ये ललित कला या क्षेत्राला पहिले प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातील ९ पैकी ८ विभागामध्ये वाणिज्य या कल क्षेत्राला सर्वांत जास्त दुसऱ्या क्रमांचे प्राधान्य दर्शवते, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले सांगितले.

विद्यार्थांचे क्षेत्रनिहाय कल
कृषी : १३.५ टक्‍के
कला-मानव्यविद्या : १३ टक्‍के
वाणिज्य : १६.६ टक्‍के
ललित कला : १७.६ टक्‍के
आरोग्य आणि जैविक विज्ञान : १०.९ टक्‍के
तांत्रिक : ९.२ टक्‍के
गणवेशधारी सेवा : १९.३ टक्‍के