सांगलीत एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ३८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. विटा येथील देवनगर-वाळुज रस्त्यावर हा अपघात झाला. टमटमला चुकवण्याच्या नादात घडला हा भीषण अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांवर विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विटा येथून भांबर्डे, देवनगर, सांगोलामार्गे विटा आगाराची बस वाळुजकडे निघाली होती. यावेळी आसपासच्या गावातील वाळूज येथील हायस्कूलला जाणारी सुमारे ५० ते ५५ मुले प्रवास करत होती. या बसमध्ये विद्यार्थी सोडून इतर एकही प्रवासी उपलब्ध नव्हता. ही बस देवनगर येथून पुढे सांगोला येथे जात असताना समोरून आलेल्या टमटमला चुकवण्यासाठी चालकाने बस बाजूला घेतली असता एसटी बस जागीच पलटी झाली.

अपघातानंतर बसमधील सुमारे ३८ शाळकरी मुलांना तातडीने विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आगार व्यवस्थापक अविनाश थोरात यांच्यासह उदय पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून रुग्णालयात दाखल असलेल्या मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर अविनाश लोखंडे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सज्ज झाली असून जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघात मोठा असला तरी सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.