अमरावती-परतवाडा मार्गावर नवसारीनजीक एसटी मिनीबस आणि स्कूल व्हॅनच्या धडकेत ४ शाळकरी विद्यार्थी ठार, तर १० जण जखमी झाले. मंगळवारी सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात घडला. जखमी विद्यार्थ्यांना शहरातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. उत्कर्ष प्रदीप निर्मळ (१०), ओम आशीष पवार (४), रोहीत सतीश कुकडे (५, सर्व रा. वलगाव), तसेच सुजल गिरीश देशमुख (७, रा. खारतळेगाव) अशी मृतांची नावे आहेत. सर्व विद्यार्थी अरुणोदय इंग्लिश स्कूल आणि पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारे आहेत.
परतवाडा मार्गावर अकोली वळण रस्त्याला जोडणाऱ्या चौकात हा अपघात घडला. वलगाव, कुंड सर्जापूर आणि खारतळेगाव येथील शाळकरी मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या एम. एच. २० / ई १२८१ क्रमांकाच्या स्कूल व्हॅनला परतवाडय़ाहून अमरावतीकडे येत असलेल्या एम.एच. ०७ / सी ७९५८ क्रमांकाच्या मिनीबसने जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जबरदस्त होती की, स्कूल व्हॅनचा मागील भाग चक्काचूर झाला आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पन्नास फुटांपर्यंत घासत गेली. अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच, तर एका विद्यार्थी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने एसटी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या.
भरधाव वेगातील स्कूल व्हॅन आणि एस.टी. मिनिबसच्या धडकेत नवसारीजवळ चार चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचा थरकाप उडवून देणाऱ्या अपघाताने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या स्कूल व्हॅनमध्ये १४ विद्यार्थी कोंबण्यात आले होते.