देवदर्शनासाठी नगर शहरातून निघालेल्या कुटुंबावर आज, शनिवारी दुपारी काळाने घाला घातला. या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले तर ९ जण जखमी झाले. सर्व मृत नगर शहरातील रहिवासी आहेत. त्यात आजी व नातवाचा समावेश आहे. एसटी बस व झायलो गाडी या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात नगर-सोलापूर रस्त्यावरील अंबिलवाडी (ता. नगर) फाटय़ाजवळील वाबळे वस्तीजवळ दुपारी अडीचच्या सुमाराला झाला.

ताराबाई शंकर भगत (५८, रा. भगतमळा, सिव्हील हडको, नगर) त्यांचा नातू अर्जुन योगेश भगत (८) व अरुण बाबुराव फुलसौंदर (६०, रा. पुलसौंदरमळा, बुरुडगाव रस्ता, नगर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे ते जवळचे नातलग आहेत व झायलो गाडीतील प्रवासी आहेत. याच वाहनातील रत्नमाला फुलसौंदर, आरती योगेश भगत, शंकर खंडोजी भगत, कृष्णा योगेश भगत हे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दरम्यान रात्री उशिरा तिघा मृतांवर शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

एसटी बसमधील प्रवासी बालाजी बिभिषेन वाघे (३०, औशिव, औसा, लातुर), राजगोपाल दायमा (३८, रा. प्रेमदान चौक, नगर), निवृत्ती सजन गरडे (४२, कसने, मालेगाव, नाशिक), शहनवाज मनोर पठाण (२६, कुमठे मिरजगाव) व मनोर इस्माईल पठाण (५०, रा. कसने) हे पाच जण किरकोळ स्वरुपात जखमी आहेत. त्यांनाही उपचारासाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रात्री उशिरा तिघा मृतांवर शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

शहरातील भगत व फुलसौंदर कुटुंबातील सहा जण झायलो गाडीतून (एमएच १६ एटी ४४७७) पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. अंबिलवाडी फाटय़ाजवळ समोरुन येणाऱ्या अक्कलकोट-मालेगाव या एसटी बसने (एमएच १४ बीटी ३३३७) झायलो गाडीला धडक दिली. धडक जोराची असल्याने झायलो गाडीचा चक्काचूर झाला, तर एसटी बसची एक बाजूही फाटली. माहिती मिळताच परिसरातील नागरिक, महामार्ग पोलीस तसेच नगर तालुका पोलीस मदतीसाठी धावले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे वाहतूक काही काळ बंद पडली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. दोन्ही अपघातग्रस्त वाहने नंतर पोलिसांनी बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.