|| महेश बोकडे

चालक, वाहकांचा तुटवडा

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) २ जानेवारीला मुंबईत झालेल्या बैठकीत रायपूर, राजनांदगावसह इतरही काही आंतरराज्य फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु चालक आणि वाहकांचा तुटवडा असल्याने नागपूरसह इतरही काही जिल्ह्य़ांत या फेऱ्या वाढणे अशक्य दिसते.

नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये एसटीच्या ५६० बसगाडय़ा २,७०० फेऱ्या करतात. त्यातील ४० गाडय़ांमधून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांतील विविध शहरात सेवा दिली जाते. नागपूर जिल्ह्य़ासाठी महामंडळाकडे ७५० वाहक आणि सुमारे ८७० चालक  आहेत.

उपलब्ध वाहक आणि चालक यांच्या तुलनेत गाडय़ाआणि फेऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्याचा ताळमेळ बसवताना महामंडळाला चांगलाच मन:स्ताप होतो आहे. त्यातच २ जानेवारीला महाममंडळाच्या व्यवस्थापैकीय संचालकांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत नागपूर-रायपूर, राजनंदगावसह इतर आंतरराज्य फेऱ्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर जिल्ह्य़ांत आजच्या स्थितीत एसटी बस आणि फेऱ्यांच्या तुलनेत १०० चालक आणि सुमारे अडीचशे वाहक कमी आहेत. नागपूरहून सध्या सर्वात लांब पल्ल्याच्या बसगाडय़ा पंढरपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, इंदूर, हैदराबादसह इतरही काही शहरांत सेवा देत आहेत.

सर्वाधिक आंतरराज्य फेऱ्या मध्यप्रदेशात

नागपूरहून एसटीच्या सर्वाधिक आंतरराज्य फेऱ्या मध्यप्रदेशात होतात. येथून इंदूर, मलाजखंड, मंडलासह इतरही काही शहरात तब्बल २५ गाडय़ांद्वारे सेवा दिली जाते. त्यानंतर तेलंगणाच्या हैदराबादसह इतर शहरांत १२ गाडय़ा जातात. छत्तीसगडच्या रायपूर, राजनांदगावसह इतर काही शहरांत तीन बसगाडय़ा जातात.

‘‘प्रशासनाकडून वाढीव आंतरराज्य फेरीसाठी  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातच  विभागाला नवीन चालक आणि वाहकही लवकरच मिळण्याची आशा आहे. त्यानंतर या फेऱ्या सुरू केल्या जातील.’’

– संजय रामटेके, प्रभारी विभाग नियंत्रक, नागपूर.