राज्य शासनाने एस टी च्या बससेवेला आंतरजिल्हा परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी येथील एस टी च्या आगारांमधून कोल्हापूर—सांगली या मार्गावर ८ गाडय़ा सोडण्यात आल्या.

या गाडय़ांमधून प्रवासासाठी पूर्वीचेच भाडे कायम ठेवल्याने पहिल्याच दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळाला. करोनाविषयक निर्बंधांचे काटेकोर पालन करून ही सेवा सुरू झाली आहे.

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून जारी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे इतर व्यवहारांबरोबरच एसटी सेवाही ठप्प झाली. फक्त गेल्या मे—जून महिन्यात परराज्यातील कामगार आणि मजुरांना सोडण्यासाठी काही विशेष फेऱ्या अल्प काळासाठी चालू होत्या. परंतु त्यातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनही मोठय़ा प्रमाणात कपात करण्यात आले. आता आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सारे व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी एसटी विभागातील गुहागर, देवरूख, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या ५ आगारांमधून मिळून एकूण ८ गाडय़ा शुक्रवारी कोल्हापूर—सांगली या मार्गावर सोडण्यात आल्या. पुढील काळात या मार्गावरील फेऱ्या वाढवण्याबरोबरच राज्याच्या इतर भागांमध्येही गाडय़ा सोडण्याचे नियोजन आहे.

या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये एसटीच्या ५६० फेऱ्या नियमित सोडल्या जात आहेत. एकावेळी गाडीमध्ये फक्त २२ प्रवाशांना घेतले जात असून जुनाच तिकीट दर आकारला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा भुर्दंड सोसावा लागत नाही. आपल्या तब्येतीची काळजी करोनाविषयक कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनी या बसमधून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

दरम्यान, आंतरजिल्हा फेऱ्यांमध्ये लवकरच मुंबई, पुणे या मार्गावर गाडय़ा सुटण्याची प्रवाशांना आशा आहे. तसेच शहरी बस फेऱ्याही सुरू झाल्या पाहिजेत, अशी मागणी होत आहे; मात्र याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.