दोन वर्षांत आर्थिक परिस्थितीही ढेपाळली; संचित तोटा १,८०० वरून २,१०० कोटींपर्यंत

राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाकडे प्रवाशांनी पाठ दाखवण्यास सुरुवात केली असून गेल्या पाच वर्षांत तब्बल १७ कोटी ६१ लाख प्रवासी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाकडूनच प्रवासी संख्येची आकडेवारी सादर करण्यात आली असून त्यामध्येच ही बाब उघड झाली. एकीकडे प्रवासी संख्या कमी होत असतानाच दुसरीकडे एसटीची आर्थिक परिस्थितीही ढेपाळली असून संचित तोटा १,८०० कोटी रुपयांवरून २,१०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात एसटीला मोठय़ा प्रमाणात आर्थिक चणचण भासू शकते.

एसटी महामंडळाकडे सध्याच्या घडीला १८ हजार ६०० बस असून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी येत्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वातानुकूलित बस टप्प्याटप्प्यात दाखल होतील. तर सर्व सोयीसुविधांनीयुक्त बस तळ व बस स्थानकांचा विकासही केला जाणार आहे. यामुळे प्रवासी आकर्षित होतील आणि आर्थिक परिस्थितीही सुधारेल, अशी आशा एसटी महामंडळाला आहे. परंतु सध्याच्या घडीला एसटीकडे प्रवाशांनी पाठच दाखवण्यास सुरुवात केली आहे. २००९-१० सालापासून ते २०१२-१३ पर्यंत एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होत होती. वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येमुळे एसटीला कोणतीही चिंता नव्हती. २००९-१० साली २३८ कोटी ५८ लाखांपर्यंत असणारी प्रवासी संख्या २०१२-१३ साली थेट २६१ कोटी ३७ लाखांपर्यंत पोहोचली.

मात्र २०१२-१३ सालानंतर प्रवासी संख्येचा आलेख उतरत गेला. २६१ कोटी ३७ लाख प्रवासी संख्येवरून  २०१६-१७ सालापर्यंत प्रवासी संख्या थेट २४३ कोटी ७६ लाखांपर्यंत पोहोचली. हे पाहता गेल्या पाच वर्षांत तब्बल १७ कोटी ६१ लाख प्रवासी कमी झाले. यासंदर्भात एसटीतील सूत्रांनी सांगितले की, साधारण जून २०१६ पासून राज्यातील एसटीच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या समांतर फेऱ्या या काही प्रमाणात बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर राज्यात होणारी अवैधरीत्या प्रवासी वाहतूक यामुळे एसटीचे प्रवासी कमी होण्यामागील कारण असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी कमी होतानाच एसटीची आर्थिक परिस्थितीही ढेपाळत आहे. २०१५-१६ मध्ये १,८०० कोटी रुपयांचा असणारा संचित तोटा २०१६-१७ मध्ये २,१०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

डिझेल दरवाढ, कर्मचाऱ्यांचा पगार यामुळे आर्थिक बोजा जास्त पडत असल्याची माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. जर सातवा वेतन आयोग लागू झाल्यास हा बोजा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याच्या घडीला एसटीचे ८ हजार कोटी रुपयांचे बजेट असून त्यात ५ हजार ३०० कोटी रुपये तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतात. सातवा वेतन आयोग लागू केल्यास १२ हजार कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडू शकतो, असे सांगण्यात आले.

यासंदर्भात रणजितसिंह देओल यांना विचारले असता, तुम्ही जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे बोला असे सांगून बोलणे टाळले.

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर ठाम

आम्ही सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोगाची मागणी केली आहे. यावर ठाम आहोत. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशान्वये १० ऑक्टोबरपासून पुन्हा वाटाघाटी सुरू होत आहेत. आमच्या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अन्यथा संप अटळ आहे. त्याचप्रमाणे १५ हजार रुपये दिवाळी भेट, १५ हजार रुपये अंतरिम वाढ, करारान्वये देय असलेला जुलै २०१६ सालापासूनचा ७ टक्के, तर जानेवारी २०१७ पासूनचा ४ टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा, अशीही आमची मागणी आहे.  – संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

आर्थिक परिस्थिती ढेपाळत असतानाही एसटीचे प्रकल्प

  • १५०० वातानुकूलित शिवशाही बस. साधारण २१ बस दाखल
  • १५ बस आगारांसाठी बस तळ प्रकल्प
  • एसटी कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय
  • आधुनिक कॉल सेंटर
  • सर्व स्थानकात सीसीटीव्ही
  • विद्याविहार येथे एक हजार कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल
  • सर्व ५६८ बस स्थानकांपैकी ८६ स्थानकांचे नूतनीकरण.

 

   वर्ष                               प्रवासी संख्या

२०१२-१३                     २६१ कोटी ३७ लाख

२०१३-१४                     २५६ कोटी ३० लाख

२०१४-१५                     २४५ कोटी ५७ लाख

२०१५-१६                      २४५ कोटी

२०१६-१७                      २४३ कोटी ७६ लाख