News Flash

विक्रमगडमधील ४० टक्के गावे ‘एसटी’रहित

अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विक्रमगड येथे यावे लागते.

|| विजय राऊत

 

एसटी बसगाडय़ा जात नसल्याने ग्रामस्थांचे हाल; आगार निर्माण करण्याची मागणी :- विक्रमगड तालुक्याची निर्मिती होऊन २० वष्रे उलटली तरी तालुक्यातील ४० टक्के गावांमध्ये एसटी बस जात नसल्याचे वास्तव आहे. डोंगराळ व दुर्गम भाग असलेल्या तालुक्यातील गावांत एसटी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पायपीट करत मुख्य गाव गाठावे लागते आणि त्यानंतरच एसटी सुविधेचा लाभ मिळतो. तालुक्यात एसटी आगार नसल्याने प्रत्येक गावात एसटी पोहोचू शकली नसल्याने विक्रमगडमध्ये आगाराची निर्मिती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विक्रमगड हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. डोंगराळ भाग असलेल्या या तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांवर आहे. या तालुक्यात जव्हार, वाडा, डहाणू, पालघर या आगारांतून बसगाडय़ा येतात. मात्र या बसगाडय़ांची संख्या अपुरी आहे. दोन बसगाडय़ांमध्येही वेळेचे खूप अंतर असल्याने अनेक प्रवाशांना एक ते दोन तास ताटकळत बसथांब्यावर उभे राहावे लागते. अन्यथा खासगी वाहनातून अधिक पैसे देऊन गर्दीतून प्रवास करावा लागतो.

अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विक्रमगड येथे यावे लागते. त्यांना एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र विलंबाने बसगाडय़ा येत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळा-महाविद्यालयात पोहोचता येत नाही. ज्या गावात बसची सुविधा आहे अशा अनेक गावात मात्र प्रवाशांना बसण्यासाठी प्रवासी शेड नसल्याने उन्हातच ताटकळत उभे राहावे लागते. ज्या गावात बस जात नसल्याने त्या गावांतील विद्यार्थी, वृद्ध, व्यापारी, रुग्ण, शेतकरी, शेतमजूर यांना नाइलाजाने खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. खासगी वाहनांमध्येही प्रवाशांची गर्दी असल्याने दाटीवाटीने प्रवास करावा लागत असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले.

विक्रमगड येथे बस आगार असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र आदिवासी ग्रामस्थांच्या मागणीकडे एसटी महामंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

बसस्थानकात सुविधांचा अभाव

तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या विक्रमगड येथील एसटी बसस्थानकातही प्रवाशांसाठी विविध सुविधांचा अभाव आहे. या बसस्थानकात प्रवाशांसाठी शौचालयाची सुविधा नाही. त्यातच येथे येणाऱ्या बसगाडय़ांचे वेळापत्रक नेहमीच बारगळलेले असते. तालुक्याचे ठिकाण असल्याने विक्रमगडमध्ये डहाणू, पालघर, जव्हार, पालघर येथून बसगाडय़ा येतात. मात्र येथील बसस्थानक लहानशा जागेत असल्याने आणि भर बाजारपेठेत असल्याने प्रवाशांसाठी अपुरे पडत आहे. बसस्थानकाजवळ बाजारपेठ असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विक्रमगड तालुक्यात बस आगार व्हावे ही मागणी प्रलंबित आहे. अनेक गावांमध्ये एसटी बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे अभ्यासाचे मोठे नुकसान होते. शासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने स्वतंत्र बस आगाराची सोय करावी. – विजय पटेल, प्रवासी, विक्रमगड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:47 am

Web Title: st bus vikramgad st depo akp 94
Next Stories
1 पद्मदुर्ग किल्ल्यावर फडकवण्यात आला महाकाय भगवा ध्वज
2 भाजपाची सत्ता ‘ऑन द वे’, नारायण राणेंचं सूचक वक्तव्य
3 मार्च महिन्यापर्यंत कोल्हापूर आणि नांदेडमध्ये सुरु होणार DNA लॅब
Just Now!
X