News Flash

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरुच; अनेक आगारांमध्ये प्रशासनाची दादागिरी

मुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणतीही मध्यस्थी नाही

संग्रहित छायाचित्र

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. एसटी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने ऐन दिवाळीत राज्यभरात प्रवाशांचे हाल होत आहेत. सातवा आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते संप हाताळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणात अद्याप हस्तक्षेप केलेला नाही.

लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसेस गेल्या चार दिवसांपासून बस आगारांमध्येच उभ्या आहेत. मुंबई वगळता राज्यभरातील लोक प्रवासासाठी प्रामुख्याने एसटीवर अवलंबून असतात. मात्र या संपामुळे त्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. ऐन दिवाळीत संप सुरु असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. याबद्दल दिवाकर रावते यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रावतेंनी संपूर्ण परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री मध्यस्थी करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांकडून कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही.

एकीकडे एसटीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचे हाल होत असताना दुसरीकडे एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप होतो आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याऐवजी प्रशासनाकडून संप चिघळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटेंनी केला आहे. ‘संप मिटवण्यासाठी सरकारने जबरदस्ती केल्यास आम्ही कुटुंबीयांसह राज्यभर जेलभरो आंदोलन करु,’ असा इशाराही तिगोटेंनी दिला.

‘एसटी प्रशासनाकडून संप चिघळवण्याचा प्रयत्न होतो आहे. विविध आगारांमधून कर्मचाऱ्यांना हाकलवून दिले जात आहे. त्यासाठी दमदाटी केली जात आहे. परिपत्रक काढून होमगार्ड्सची भरती करुन एसटी काढल्या जात आहेत. बुधवारी देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार आम्हाला ४ ते ५ हजारांची पगारवाढ मिळेल. त्यामुळे आमचा पगार १२ ते १३ हजार रुपये होईल. मात्र या पगारातून आमच्या मूलभूत गरजा भागणार नाहीत,’ अशी व्यथा इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटेंनी मांडली. ‘इतर राज्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, ही आमची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहेत. त्यांनी चर्चेसाठी बोलावल्यास आम्ही तयार आहोत,’ असेही ते म्हणाले.

सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या मुजोरीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र अनेक आगारांमध्ये दिसून येत आहे. पंढरपूरमध्ये संपादरम्यान विश्रामगृहात आराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून अर्धनग्न अवस्थेत बाहेर काढण्यात आले. संपावर असणारे कर्मचारी विश्रांती घेत असताना परिवहनचे अधिकारी अचानक विश्रांतीगृहात आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना थेट विश्रांतीगृहाच्या बाहेर काढले. तर सोलापुरातील एसटीच्या विभागीय कार्यालयाने संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश काढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 9:50 am

Web Title: st buses strike continues on 4th day in maharashtra
Next Stories
1 राज्यात रोज दोन लाख लिटर दुधात भेसळ
2 कोकणवासीयांचे प्रवासाबाबत शुक्लकाष्ठ सुरुच!
3 रेल्वेसाठी तोबा गर्दी
Just Now!
X