१५० बस दाखल होणार; निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई : सुकर आणि पर्यावरणस्नेही प्रवास होण्यासाठी एसटी महामंडळ विजेवर धावणाऱ्या १५० वातानुकूलित बस ताफ्यात दाखल करणार आहे. या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येत असून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जुलैअखेर निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.

केंद्र सरकारने विजेवर धावणाऱ्या बसना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. या बसमुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच इंधनखर्चही कमी होणार आहे. त्यामुळे एसटीने या विजेवर चालणारी बस सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीला प्रत्येक बसच्या इंधनासाठी प्रति किलोमीटरमागे १ रुपये २० पैसे खर्च येतो. तर विजेवरील बससाठी हाच खर्च प्रतिकिमीसाठी ६४ पैसे होईल. सध्या मुंबई, ठाणे तसेच नागपूर शहरात अशा बस स्थानिक पालिकांकडून चालवण्यात येतात.

एसटी महामंडळानेही भाडेतत्त्वावर विजेवर चालणाऱ्या १५० वातानुकूलित बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले की, विजेवर धावणाऱ्या बससाठी निविदा काढली असून जुलैअखेपर्यंत ती सादर करण्याची मुदत आहे. ज्या कंपन्या बस पुरवठा करतील त्यांच्याकडूनच या बससाठी लागणारी चार्जिगची सुविधा पुरवली जाणार आहे. २५० किलोमीटपर्यंतच्या अंतरापर्यंत धावू शकतील अशा बस घेण्यात येतील. या सर्व बस आसन प्रकारातील असतील.

मुंबई ते पुणे मार्गावर चाचणी

मुंबई-पुणे मार्गावर सध्या शिवनेरी, अश्वमेध या वातानुकूलित बस धावतात. विजेवरील बससाठी लागणारी चार्जिगची समस्या पाहता कमी अंतरावरच या बसगाडय़ा चालवण्यात येतील. त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर विजेवरील बसची चाचणी घेतली जाईल व त्यानंतर या मार्गासह अन्य काही मार्गावर बस चालवल्या जातील.