कर्मचाऱ्यांची मनमानी, मर्जीप्रमाणे वेळापत्रक, आगारप्रमुखांचे दुर्लक्ष याचा नित्य फटका येथील प्रवाशांना बसत आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही यात काहीही फरक पडत नसल्याने एस.टी.ची बससेवा प्रवाशांच्या सेवेसाठी की गैरसोयीसाठी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. महामंडळाच्या वरिष्ठांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी त्रस्त प्रवाशांची मागणी आहे.
हिंगोलीच्या आगारात वेळापत्रकाला नावालाही महत्त्व नसून, कर्मचाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे बसगाडय़ा उशिराने सोडल्या जातात. उशिराच्या बसमुळे वेळेवर अवलंबून प्रवास करणारे प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. आगारप्रमुख नेहमीच गैरहजर असतात, अशी प्रवाशांची सततची तक्रार आहे. आगाराच्या कार्यपद्धतीत काहीही सुधारणा होत नाही. भंगारातच काढता येतील, अशा बसगाडय़ा येथून सोडण्यात येत आहेत. आगारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, साधी पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याचीही कमतरता आहे.
हिंगोली आगारातून हैदराबाद व पुणे येथे सकाळी ६ वाजता सुटणारी बस गुरुवारी मात्र डिझेल भरले नसल्याचे कारण देत पाऊण तास उशिराने सोडण्यात आली. पुणे येथे जाणाऱ्या बसचे टय़ूबटायर खराब असल्याचे चालकाला ऐन वेळी लक्षात आले. त्यामुळे वसमत आगाराची बस (एमएच २० बीएल २६३०) सोडण्यात आली. विशेष म्हणजे वसमतला हिंगोली आगारातून गुरुवारपासूनच सकाळची पहिली बस चालू केली जाणार होती. आगारप्रमुखांकडे तक्रार करण्यास गेल्यावर तेथे ते हजर नसल्याचे आढळून आले.