औरंगाबाद जिल्ह्य़ातील कोषागार कार्यालयात ५५ कोटी रुपयांचे मुद्रांक पडून आहेत. एक हजाराहून अधिक रकमेचे मुद्रांक वितरित न करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. पुणे येथे १०० व ५०० रुपयांचे दोन मुद्रांक बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याबाबतचा गुन्हा पोलिसात नोंदविण्यात आला. बनावट मुद्रांक नाशिक येथील शासकीय मुद्रणालयात पाठविण्यात आले आहेत. ते कसे तयार झाले, या बाबत संपूर्ण अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरापासून राज्यातील एक हजाराहून अधिकचे मुद्रांक वितरित व विक्री केले जात नाहीत.
कायदेशीर कागदपत्रांसाठी आवश्यक त्या प्रमाणात मुद्रांक विक्रीसाठी जिल्हा कोषागार कार्यालयात १०० रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंतचे मुद्रांक उपलब्ध करून दिले जातात. औरंगाबाद जिल्ह्य़ात ५७ कोटी रुपयांचे मुद्रांक उपलब्ध करून देण्यात आले होते. उपलब्ध करून दिलेल्या मुद्रांकांपैकी २ कोटी रुपयांचा साठा तालुकास्तरावर वितरित करण्यात आला, तर अन्य साठा जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. मात्र, तो वितरित होण्यापूर्वीच त्याची विक्री व वितरण केले जाऊ नये, असे आदेश मुद्रांक विभागाने दिले.

पुणे येथे दोन मुद्रांक बनावट असल्याचे उघडकीस आले. ज्या मुद्रांक विक्रेत्याकडून मुद्रांक विक्रीची नोंद झाली, त्याने ते मुद्रांक त्याच्याकडून विक्री झाली नसल्याचे कळविले. ज्यांच्या नावावर मुद्रांक विक्री केली होती ते नाव आणि मुद्रांक यात फरक आढळल्याने पुणे पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आणि त्यानंतर वितरण व विक्री थांबविण्यात आली. सापडलेले बनावट मुद्रांक १०० आणि ५०० रुपयांचे होते.
प्रत्येक जिल्ह्य़ातील कोटय़वधी रुपयांच्या मुद्रांक साठय़ाची विल्हेवाट कशी लावायची, या बाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही. सरकारने निर्णय घेतल्यानंतर मुद्रांक साठय़ाबाबतचा निर्णय घेतला जाईल.
 -श्रीकर परदेशी, मुद्रांक विभागाचे महासंचालक