सोळाव्या लोकसभेसाठी राज्यात सर्वाधिक ३९ उमेदवार बीड मतदारसंघातून, तर सर्वात कमी उमेदवार बारामती मतदारसंघात असल्याने पहिला निकाल बारामतीचा आणि सर्वात शेवटी बीड मतदारसंघाचा निकाल लागेल, असा निवडणूक अधिकाऱ्यांचा कयास आहे. निवडणुकीच्या मदानात ‘बीडविरुद्ध बारामती’ असा रंगलेला सामना मतमोजणीच्या निकालात मात्र पहिला आणि शेवटचा राहणार आहे!
बीड मतदारसंघातून राज्यात सर्वाधिक ३९ उमेदवार िरगणात आहेत. येथे भाजपचे गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यात सरळ लढत झाली. प्रचारात ‘बीडविरुद्ध बारामती’ असा सामना रंगला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये मुक्काम ठोकून प्रचाराची राळ उडवली.
शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे उमेदवार असलेल्या बारामतीत महायुतीचे महादेव जानकर यांच्यासाठी मुंडे, त्यांची कन्या आमदार पंकजा पालवे यांनी सभा घेऊन रान पेटवले. त्यामुळे आता बीडच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष आहे. सुमारे ७० टक्के मतदान झालेल्या बीडमध्ये ९ हजार ४०४ यंत्रांत उमेदवारांचे भवितव्य बंद असून, सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होईल. आयोगाकडून १२ टेबल जास्तीचे मंजूर करून घेण्यात आल्याने ९६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निकालाला उशीर लागेल असा अंदाज आहे. बारामतीत सर्वात कमी उमेदवार असल्यामुळे तेथील निकालानेच सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे निकालाच्या दिवशीही बीड आणि बारामती चच्रेच्या केंद्रस्थानी राहणार आहे.