अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. याआधी नवरात्रीत विस्तार केला जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिवाळीपर्यंत हा विस्तार करणार असल्याचं सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांना याआधी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल विचारलं असता त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण कधी हे मात्र आताच सांगणार नाही असं म्हटलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी त्यांनी पुढचा मुख्यमंत्री मीच असे वक्तव्य केले होते. ज्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राज्यात दुष्काळ असताना या गोष्टी बोलणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री अजून झोपेत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली होती.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. भाजपाचे संघटन महामंत्री रामलाल यांच्यासोबत फडणवीस आणि दानवे यांनी दिल्लीतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये प्रदीर्घ चर्चा केल्याचे समजते. या बैठकीत शिवसेनेबरोबर जागावाटप, एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती.

प्रदीर्घ काळापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. ठराविक कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत असते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर चर्चेसाठी दिल्लीत गेले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. महामंत्री रामपाल यांच्याबरोबर सुमारे ४ तास बैठक झाली होती. यात विविध विषयांवर चर्चा झाली. पक्षाध्यक्ष अमित शाह निवडणूक प्रचार दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती.