आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत राजकीय तसेच सध्याच्या करोना परिस्थितीवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. करोना संदर्भात मुख्यमंत्री नवे नियम जारी करणार आहेत का? हे बघणं देखील महत्वाचं आहे.

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही, अद्यापही दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत व करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दुसऱ्या बाजूला करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे करोना निर्बंधांसंदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता आज शक्यता आहे.

राज्य सरकारकडून निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाउनचा इशारा देखील दिलेला आहे. शिवाय, तिसऱ्या लाटेचा धोका देखील तज्ज्ञांकडून वर्तवला गेलेला आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे.

गणेशोत्सवावर तरी निर्बंध नकोत – शेलार

सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप व मनसे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंगळवारी रोखले. ठाकरे सरकारची पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची दडपशाही सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात तरी निर्बंध लादू नयेत, अशी मागणी भाजप नेते आशीष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार का, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.