केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय आज (मंगळवार) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरानं अन्नधान्य देण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या मोफत धान्य योजनेप्रमाणे राज्याने स्वतंत्र योजना तयार करुन अन्नसुरक्षेचा शिक्का नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मोफत धान्य द्यावे. त्याचा खर्च आमदार निधीतून करावा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने हातावर पोट असलेल्या आणि गरीब गरजुंसाठी अन्नधान्याच्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. मात्र केशरी शिधापत्रिकाधारकांचाही राज्य सरकारने योग्य तो विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर आज पार पडलेल्या बैठकीत केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय :

१. केशरी शिधापत्रिका धारकाना एप्रिल ते जून २०२० या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत.

२. कोविडच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.

३. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय.

४. कोरोना विषाणुबाबत उपाययोजनांची माहिती.