मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूंकप होईल असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. मात्र मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील असा टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही राजकीय भूंकप होईल असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. त्यावर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी भाजपाला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही असं म्हटलं आहे.

“महाराष्ट्रात असं ऑपरेशन करायला भाजपाच्या राज्यातील आणि दिल्लीच्या नेत्यांना अनेक जन्म घ्यावे लागतील हे त्यांना माहित नाही. काही भाजपचे नेते यासाठी मुहूर्त शोधत आहेत. मुहूर्त शोधणं हे त्यांचं काम आहे. मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद महाराष्ट्रातील भाजपाला घ्यायचा असेल तर एप्रिल, पाडवा काय दिवाळीपर्यंत घेतला तरी चालेल. पण तो मध्य प्रदेशाचाच घ्यावा लागेल. भाजपला महाराष्ट्रात असा आनंद घेता येणार नाही,” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही भूकंप होणार”, रामदास आठवलेंचा दावा

महाराष्ट्रातही सरकार पडणार! चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणेच अनेक नेत्यांची आघाडी सरकारमध्ये कुचंबणा होत आहे. हे नेते त्यांचा पक्ष सोडून भाजपला येऊन मिळतील, असे पाटील यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याचा ठामपणे इन्कार करीत भाजप नेत्यांनी स्वप्ने पाहू नयेत, असे स्पष्ट केले.