राज्य सहकारी भूविकास बँकेच्या ३२ हजार शेतकऱ्यांचे २८१ कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी शासन विचाराधीन आहे. त्यामुळे अकराशे बँक कर्मचाऱ्यांचे २८० कोटींचे मानधन शासन देईल, अशी घोषणा राज्याचे सहकार पणन, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर लवकरच निर्णय घेईल, असे ते म्हणाले. सहकार कार्यकर्ता मेळावा सावंतवाडीत आयोजित केला त्या मेळाव्यात सहकारीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली. या वेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, माजी आमदार अजीत गोगटे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, जिल्हा बँक संचालक आर. टी. मर्गज, प्रकाश परब, अनंत ओरवणेकर, जिल्हा बँक महाव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई, मनोज नाईक, काका मुडलकर, आनंद नेमगी, नीलेश तेंडोलकर आदी उपस्थित होते.
सहकार महर्षी कै. शीवरामभाऊ जाधव व प्रा. कै. डी. बी. ढोलम यांचे स्मरण यांच्या प्रतीमेस पुष्पांजली वाहण्यात आली. सुरुवातीला जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
राज्य भूविकास बँकेने सुमारे ३२ जार शेतकऱ्यांचे २८१ कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्ज माफ करताना अकराशे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वेतन २८० कोटी शासन देईल, तसेच भूविकास बँकेची प्रॉपर्टी शासन जमा करून घेईल, असे सहकारमंत्री ना. पाटील म्हणाले.
महाराष्ट्र राज्यात सुमारे एक लाख बोगस संस्था आहेत. आतापर्यंत ७० हजार संस्था बोगस असल्याचे उघड झाले आहे. या पिशवीतील बोगस संस्था मतदानासाठी तयार करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यात ८ कोटी लोकांतील साडेसहा कोटी लोक सहकाराशी जोडले आहेत. सुमारे ५४ प्रकार सहकार क्षेत्रात मोडतात, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
गुजरातपेक्षा महाराष्ट्रात सहकार संस्था अधिक आहेत. सिंधुदुर्गचे सहकार क्षेत्रात उत्तम काम आहे, असे सांगून सहकारी संस्थांच्या चौकशीमुळे सांगली, कोल्हापूरचे टगे लोक घाबरले आहेत त्याच्या पदावर गदा येण्याची भीती निर्माण झाल्याचे ना. पाटील म्हणाले. गुजराथच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाप्रमाणेच सिंधुदुर्गचा सहकार आहे, अशी शाबासकी
चंद्रकांत पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग सहकारात गुजराथप्रमाणे क्वॉलिटी मेंटेन करतो असे ते म्हणाले. सहकार खात्यात पारदर्शक काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सहकार संस्थाां शोध घेत आहेत त्यामुळे एक लाख संस्था बोगस आढळणार असल्याचे ते म्हणाले. सहकार क्षेत्रात नेटवरदेखील रजिस्ट्रेशन करण्याची तयारी ठेवल्याचे ते म्हणाले.
व्यापाऱ्याला नव्हे तर शेतकऱ्याला राजा करणाऱ्या योजना सहकार,पणनमधून घेण्यात येत आहे. त्यासाठी कोल्ड स्टोअरेज व गोदाम योजनेचा लाभ संस्थांना घेता येईल, तसेच मागेल त्यांना गोदाम देण्याचा विचार आहे. आतापर्यंत ४२ कोल्ड स्टोअरेज देण्यात आले असून, त्यांचा कारभार यशस्वीपणे सुरू आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
आंबा व काजू महामंडळाचे सक्षमीकरण करताना आंबा निर्यातक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. रत्नागिरीला वाशीचे केंद्र आणता येईल, पण निर्यात होणाऱ्या आंब्याला तांत्रिकदृष्टय़ा परवडणारे नाही, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना हवे ते देण्याची सरकारची तयारी आहे. आम्ही स्वत:ला विकूनदेखील शेतकऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पतसंस्थांच्या १० हजारांच्या ठेवी देण्याचा यापूर्वी निर्णय झाला. आता ५० हजापर्यंतच्या ठेवी देण्याचा मानस ना. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कोकणातील माणूस मुंबईत जायला नको, असा सहकार रुजवा, त्यासाठी सहकार निश्चितच प्रयत्न करील. सहकार वाढवा, सहकाराचा स्वाहिकार होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन ना. पाटील यांनी केले.
सिंधुदुर्गच्या प्रत्येक तालुक्यात पाच कोटींचा किंवा दहा कोटींचा प्रकल्प निर्माण करा त्याला आर्थिक मदत करण्याची तयारी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
या वेळी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार अतुल काळसेकर यांनी केला. या वेळी पुरस्कारप्राप्त संस्थांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, राजन तेली, प्रमोद जठार, अ‍ॅड्. अजित गोगटे, प्रकाश परब, अतुल काळसेकर यांनी मनोगत व्यक्त केले.