उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील एकूण १०३ गावं पुरानं बाधित झाली आहेत. ४१ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. पूरस्थिती पाहता दोन लाख जणांना स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषेदत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. “केंद्र सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी, राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी तसूभरही कमी पडणार नाही.”, असं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी आमदार आणि खासदारांचं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्त भागाला देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

धरण क्षेत्राबरोबरच यावेळी फ्री कॅचमेंट एरियात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. त्याचा फटका महाराष्ट्रात जवळपास ९ जिल्ह्यांमध्ये बसला. या अभूतपूर्व संकटाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केंद्र शासनाशी बोलल्यानंतर केंद्रानेही चांगली मदत केली. एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही यांची या संकटात चांगली मदत झाल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अतिवृष्टी आणि महापूराचा फटका सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे.

“अद्यापपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. नुकसानीचे आकडे निश्चितपणे बदलणार आहेत. जसं जसं पाणी कमी होतंय. तस तसं शेती पूर्ण वाहून गेली आणि किती नुकसान झालं याची आकडेवारी येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना पंचनामे सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारनेही राज्याला चांगलं सहकार्य केलं. राज्य सरकारचा केंद्र सरकारशी चांगला समन्वय आहे. आर्थिक बाबतही किती भार येईल याबाबतही त्यांच्याशी बोलू. राज्य सरकारही तिथे मागे राहणार नाही.”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. राज्यातील पूरव्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सांगली शहरातील पूरबाधित स्टेशन चौक परिसराला भेट दिली.स् थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा केली.सोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. रस्ते आणि पुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्ह्यात २४ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे एनडीआरएफची दोन पथकं कार्यरत आहेत.