सहकारी आणि खासगी दूध डेअरीधारकांनी सरासरी २० रुपये प्रति लिटर किंमत द्यावी. तसेच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति लिटर ५ रुपये दरवाढ द्यावी. त्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मांडली. येत्या २१ जुलैपासून शेतकऱ्यांना प्रति लिटर ३ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत घेण्यात आला. त्या निर्णयावर खासदार राजू शेट्टी यांनी ही भूमिका मांडली.

यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरीवर्गाची फसवणूक केल्याचे अनेक प्रकरणातून दिसून येत आहे. महिन्याभरापूर्वी सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा दिला होता. पण अद्यापही त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेलेला नाही. ही दुर्देवी बाब असून आता सहकारी आणि खासगी दूध उत्पादकांडून प्रति लिटर ३ रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तो आम्हाला मान्य नसून सहकारी आणि खासगी दूध डेअरीधारकांनी सरासरी २० रुपये प्रति लिटर किंमत द्यावी. तसेच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति लिटर ५ रुपये दरवाढ दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले.

खासदार राजू शेट्टी हे त्यांच्या मागणीवर कायम राहिल्याने आता राज्य सरकार काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.