28 February 2021

News Flash

करोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन

खासगी प्रयोगशाळेत ४५०० रुपये दर

संदीप आचार्य

करोनाच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे भरमसाठ दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या खासगी प्रयोगशाळेत करोनाच्या चाचणीसाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागत असल्याने गरीब रुग्णांना ते परवडू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन हे दर कमी करण्यासाठी या समितीची स्थापन करण्यात आली आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘आयसीएमआर’ने राज्यात एकूण ८० प्रयोगशाळांना करोना चाचणीसाठी मान्यता दिली आहे. यात ४४ प्रयोगशाळा या शासकीय आहेत तर ३६ खासगी प्रयोगशाळा आहेत. शासकीय प्रयोगशाळेत करोना रुग्णांच्या मोफत चाचण्या केल्या जात असून खासगी प्रयोगशाळेत याच चाचणीसाठी साडेचार हजार रुपये दर आकारला जातो. या चाचणीसाठी लागणारे किट्स परदेशातून मागवावे लागत असल्याने चाचणीसाठी जास्त खर्च येत असल्याचा खासगी प्रयोगशाळांचा दावा आहे. मात्र, आता हे किट्स भारतातही मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याने खासगी प्रयोगशाळांनी चाचणीचे दर कमी केले पाहिजे अशी भूमिका घेत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वाटाघाटी करून दर कमी करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यांमध्ये आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश आहे.

राज्यात मंगळवार पर्यंत ७२ हजार ३०० करोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३३ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यात २४६५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मृत्यूदर हा ३.४ टक्के एवढा आहे. करोनाच्या सुरुवातीच्या काळात हाच मृत्यू दर ७.३ टक्के एवढा होता. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात करोना चाचणीचे प्रमाण जास्त असून राज्यातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा चाचणीचे प्रमाण मुंबईत अधिक आहे. राज्यात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ४५३ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकूण ५५५ प्रयोगशाळा असून राज्यात ८० प्रयोगशाळांच्या माध्यमातून वेगाने चाचण्या केल्या जात आहेत. सुरुवातीला खाजगी प्रयोगशाळांच्या चाचणीचे अहवाल मिळण्यास तीन ते सहा दिवस लागायचे. मात्र आता हे अहवाल चोवीस तासाच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशात आजघडीला दर दहा लाख लोकांमागे २ हजार ३६३ करोना चाचण्या केल्या जातात. तर राज्यात हेच प्रमाण दहा लाख मागे १३ हजार एवढे आहे.

मुंबई व पुण्यासारख्या शहरातील वाढते करोना रुग्ण आणि आता ग्रामीण भागाकडे सरकू लागलेला करोना याचा विचार करता आगामी काळात अधिक प्रयोगशाळांना मान्यता मिळेल आणि जास्तीजास्त चाचण्या करण्यास सरकारचे प्राधान्य राहील, असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. या सर्वाचा विचार करून करोना चाचणीचे खाजगी रुग्णालयातील दर कमी करण्यासाठी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून एका आठवड्यात समिती आपला अहवाल सादर करेल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 5:01 pm

Web Title: state government new committee for coronavirus testing rates in maharashtra jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 निसर्ग वादळाने महाराष्ट्राची किनारपट्टी ओलांडली
2 सोलापूरच्या महापौरांनाही करोनाची लागण, खासगी रूग्णालयात उपचार सुरू
3 पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार; हवामान विभागाची माहिती
Just Now!
X