गंभीर ते अतिगंभीरतेकडे वाटचाल करणारे करोना रुग्ण तसेच म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजारांच्या रुग्णांसाठी सध्या जीवरक्षक इंजक्शनचा तुटवडा राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाणवत आहे. आगामी काळात यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करून यासाठी अत्यावश्यक असेलेल्या तीन जीवरक्षक इंजक्शनचे सव्वा कोटी डोसेस महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, अशी विनंती राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्रातील एकूण अॅक्टिव्ह रुग्ण तसेच त्यातील अतिदक्षता विभागात ऑक्सिजन, रेमडेसिवीर तसेच स्टिरॉईडच्या उपचाराखाली असलेल्या रुग्णांना प्रामुख्याने इंजक्शन मिथाईल प्रेडनीसॉल, लो मॉल्युक्युलर वेट हेपरिन आणि अॅम्फोथ्रीसिन यांची आवश्यकता असते. गेल्या काही दिवसांपासून ही तिन्ही इंजक्शन राज्यातील काही भागात रुग्णांना मिळत नसल्यामुळे करोना रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आगामी दोन आठवडे ही परिस्थिती अशीच राहिली तर राज्यातील अनेक रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात, अशी भीती राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी केंद्रीय औषधी द्रव्ये, खते व रसायने विभागाच्या सचिव एस. अपर्णा यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात ही तीन इंजक्शन मिळत नसून पुढील दोन आठवड्यात परिस्थिती कठीण होईल, असे मुख्य सचिव कुंटे यांनी म्हटले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या स्तरावर हस्तक्षेप करून ही इंजक्शन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढविण्यास तसेच महाराष्ट्राला पुरेसा इंजक्शन पुरवठा करण्यास सांगावे, अशी विनंती सिताराम कुंटे यांनी केली आहे. यातील मिथाईल प्रेडनीसॉल व लो मॉल्युक्युलर वेट हेपरिन हे ऑक्सिजन व रेमडेसिवीर उपचारावरील रुग्णांसाठी आवश्यक आहे. यातील मिथाईल प्रेडनीसॉल हे रेमडेसिवीर बरोबर द्यावयाचे स्टिरॉइड आहे तर हेपरीन हे रक्तातील गुठळी नष्ट करण्यासाठी वापरले जाते. एका रुग्णाला साधारणपणे २० वायल लागत असून प्रेडनीसॉलची रोजची गरज ७० हजार वायलची असून नव्वद दिवसांसाठी सहा लाख ३० हजार वायल लागणार आहेत. तर मॉल्युक्युलर हेपरिनची रोजची गरज एक लाख ४० हजार वायल एवढी असून नव्वद दिवसांसाठी एक कोटी २६ लाख वायल लागतील, असे मुख्य सचिवांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्रात आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला असून म्युकरमायकोसिसचा फैलाव रोखण्यासाठी अॅम्फोथ्रीसिन या इंजक्शनची मोठ्या प्रमाणात गरज लागणार असल्याचे कुंटे यांनी नमूद केले आहे.

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याबरोबरच नाकावाटे यात बुरशी शरीरात प्रवेश करते. ही बुरशी डोळ्यातील पेशी व मेंदुतही प्रवेश करते. यात अनेकांना अंधत्व आले असून या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त वाढू शकते. नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना सुज व लालसर डोळे होणे आदी याची लक्षणे असून स्टिरॉइडचा जादा वापर केल्यामुळे हा आजार होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर अॅम्फोथ्रीसिन बी प्लेन याच्या १४ वायलचा डोस देणे गरजेचे असून राज्यातील अनेक भागात आज हे इंजक्शन उपलब्ध नाही. अतिदक्षता विभागातील जवळपास पाच टक्के रुग्णांना म्युकरमायकोसिसचा त्रास आढळून आला असून आगामी काळात या रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी हीच भीती मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी केंद्रीय औषधी द्रव्ये व खते आणि रसायने विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. अॅम्फोथ्रीसिनच्या १,३८,६०० वायलची आवश्यकता असून या तिन्ही औषधांचे उत्पादन करणार्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यास सांगावे तसेच महाराष्ट्राला जास्तीजास्त इंजक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी, अशी विनंती मुख्य सचिवांनी आपल्या पत्रात केली आहे.