भेटी-गाठींना जोर, स्थानिक पातळीवर सर्व सक्रिय
औरंगाबाद : राज्य सरकार स्थिर आहे, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्ये सुरू असतानाच शिवसेनेने शिवसंपर्क अभियान नव्याने सुरू केले आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नसेल त्या मतदारसंघात स्वबळाची चाचपणी नव्याने सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री आणि शहरातील औरंगाबाद पूर्व या तीन मतदारसंघात आमचे जे आहे ते राखून ठेवू यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. एका बाजूला शिवसंपर्क मोहीम सुरू असताना  चंद्रकांत खैरे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आणि दौरे करू लागले आहेत. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेच्या पाश्र्वाभूमीवर ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. विधानसभा निवडणुकीमध्येही सेनेत दोन गट निर्माण झालेच होते. त्या दोन गटांना पुन्हा एकत्रित आणणे, गावस्तरावर होणारी विकासकामे आणि झालेली विकासकामे याची उजळणी करणे असे शिवसंपर्क मोहिमेचे उद्दिष्ट असून शहरी आणि ग्रामीण दोन्ही मतदारसंघात पुनर्बांधणीचे प्रयोग सुरू झाले आहे.

सेनेची बांधणी करणारे बहुतांश नेते सत्ताकाळात दूर फेकले गेलेले आहेत. दिवाकर रावते, अनंत गीते, आनंदराव अडसूळ, रामदास कदम ही मंडळी सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळणारे रामदास कदम यांच्याकडे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांची जबाबदारी आहे. पण ते मराठवाड्यात संपर्कासाठी आल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे नेते आणि आमदार शिवसंपर्क मोहिमेत गावोगावी जाऊन ‘मनोमीलन’ घडवीत आहेत. निवडणुका नसतानाही जिल्ह्यात संपर्क मोहिमा सुरू आहेत. अगदी एमआयएमकडूनदेखील तहसील स्तरावर संपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. अधिवेशनामुळे खासदार इम्तियाज जलील दिल्लीत असल्याने त्याला काहीसा विराम मिळाला आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जातवार झालेली समाजातील विभागणी या मोहिमांमध्येही दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. कधी काय होईल याविषयीच्या शंका असल्याने आपण संपर्कात नाही, असे होऊ नये म्हणून संपर्क मोहिमा तेजीत आहेत.

‘आम्ही संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीच्या काळामध्ये काही वेळा वाद होतात, पण ते दूर करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी लागते. या शिवाय सर्वसामान्य माणसांच्या आशा-अपेक्षा जाणून घ्याव्या लागतात म्हणून ही संपर्क मोहीम अधिक गंभीरपणे करत आहोत.  – अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, औरंगाबाद