दिल्लीतील प्रख्यात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ (एमएसडी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. ‘एमएसडी’च्या रचनेसाठी राज्य सरकारने बुधवारी कार्यकारी समितीची स्थापना केली आहे.

देशभरातील रंगकर्मींची पंढरी म्हणून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ला ओळखले जाते. महाराष्ट्रातील तरूण रंगकर्मींना नाटकांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी आणि रंगभूमीविषयक नव्या संकल्पना आणि प्रयोगांना वाव मिळावा यासाठी ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ सुरु करण्यात येणार आहे. रंगभूमीच्या सर्वांगिण विकासाला वाहिलेले हे संकुल असेल, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’साठी राज्य सरकारने कार्यकारी समिती स्थापन केली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतील, तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीतील सदस्य असतील. याशिवाय मुंबई विद्यापीठाचे अमोल देशमुख, अभिराम भडकमकर आणि दीपक करंजीकर यांचाही समितीत समावेश असेल. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे या कार्यकारी समितीमध्ये सदस्य सचिव असतील. आगामी सहा महिन्यांमध्ये अभ्यासगट राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.

उद्योन्मुख कलाकारांना सुवर्णसंधी
दिल्लीतील एनएसडीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी देशभरातील तरुण इच्छुक असतात. एनएसडीतील प्रवेशासाठी स्पर्धा तीव्र असते. राज्यातून एक किंवा दोन जणांनाच एनएसडीत प्रवेश मिळतो. त्यामुळे राज्यात एमएसडी सुरु केल्यास मराठी कलाकारांना नवीन संधी निर्माण होईल, असा दावा सरकारतर्फे केला जात आहे. एमएसडीमध्ये मराठी लोककला व लोकनाट्याचा अभ्यास करता येईल, असे सूत्रांनी सांगितले.