विरोधी पक्ष संपवण्याचे राजकारण हे सरकार करते आहे असा गंभीर आरोप वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. अजित पवार यांच्या चौकशीसाठी जे टायमिंग वापरलं जातं आहे ते राजकीय आहे असा वास येतो आहे. विरोधक एक एक करुन संपवायचं धोरण हे सरकार अवलंबतं आहे. टू जी घोटाळ्यातले सगळे आरोपी भाजपाची सत्ता असताना सुटले आहेत. फक्त विरोधी पक्षच नाही तर विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चंद्रकांत पाटील हे एक उदाहरण आहेत. उद्धव ठाकरेंना विचारा की ते का बोलत नाहीत? कारण ब्लॅकमेलिंगची भीती सगळ्यांनाच आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात जो अहवाल आहे तो प्रकाशित का केला जात नाही? हा अहवाल मुख्यमंत्र्यांनी समोर आणावा अन्यथा डोंगर पोखरुन उंदिर काढला अशी परिस्थिती होईल. असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम सोबत युती कायम असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. असुदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत बैठक झाली की पुढची माहिती तुम्हाला देऊ असंही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितलं.