29 November 2020

News Flash

राज्य सरकार मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मत्स्यालय; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी सुरू करण्याचा विचार

देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी शहरात बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या प्रमाणे जागतिक दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) राज्य सरकार उभारणार आहे. मत्स्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्सालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

शहरातील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी शहरात सी वर्ल्ड, टुरिझम स्ट्रीट, फ्लेमिंगो टुरिझम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी आदी सुरु करता येईल का, याबाबतही यावेळी चर्चा झाली. शहराला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कान्हेरी गुफा, जोगेश्वरी गुफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. तसेच राज्यात असे एखादे योग्य ठिकाण शोधून तिथे आताच्या युगातील लेणी विकसित करता येतील. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरु करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करुन ‘थीम बेस्ड’ संग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सिंधुदूर्गमधील सबमरीन पर्यटन प्रकल्पाचा आढावा घेतला. सिंधुदूर्ग विमानतळ आणि या प्रकल्पाला दर्जेदार रस्त्यांची जोड देण्यात यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करुन त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बैठकीला आमदार आदीत्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 9:06 am

Web Title: state government will build international level aquarium in mumbai chief minister thackeray direct to officer bmh 90
Next Stories
1 मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
2 भाजप खासदाराचा दावा फडणवीस यांनी फेटाळला
3 सोलापुरात कांद्याची उसळी; १५ हजारांचा उच्चांकी दर
Just Now!
X