राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४,८५० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. करोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान आहे.
एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट
आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या करोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे आजचे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्वाचे केंद्र बनेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्याला उद्योजकांचे प्राधान्य
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, युके, स्पेन, जपान, सिंगापूर यासारख्या देशांतील जागतीक उद्योजकांनी आज सामंजस्य करार केले असून आजही राज्यास गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जात आहे. डेटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क, मॅनुफॅक्चर या सर्व क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक असणारे वातावरण राज्यात उपलब्ध आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 9:37 pm