राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार जिल्हा खऱ्या अर्थाने टोलमुक्त झाला आहे. जिल्हय़ातील पाचही टोलनाक्यांवर छोटी वाहने व एसटीला टोलमुक्ती मिळाली असून, हा विळखा पूर्ण मोकळा झाला आहे. मुख्यत: नगरकरांना नगर-पुणे प्रवास आता ‘टोल(ळ)धाडी’विना करता येईल.
राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या आदेशात राज्यातील १० टोलनाक्यांवरील टोल पूर्णपणे बंद केला असून ३१ मार्गावर कार, जीप व एसटी बस या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकारांत जिल्हय़ातील पाचही टोलनाक्यांवर टोलमुक्ती झाली आहे. पहिल्या गटातील पूर्ण टोलमुक्तीत नगर-सोलापूर राज्यमार्गावरील अकोले येथील टोलनाक्याचा समावेश आहे. येथे पूर्ण टोलमुक्ती देण्यात आली असून, दुसऱ्या गटातील जिल्हय़ातील नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शेंडी, याच राज्यमार्गावरील खडका फाटा, नगर-कोपरगाव मार्गावरील देहेरे आणि नगर-पुणे राज्यमार्गावरील म्हसणे फाटा (सुपे) या चार टोलनाक्यांचा समावेश आहे. या चार टोलनाक्यांवर कार, जीप, एसटी बस या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे. उद्या (रविवार) मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू होणार आहे.
राज्यातील मध्यवर्ती शहर व विदर्भ-मराठवाडय़ाला पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे शहर म्हणून नगरचे दळणवळणाचे महत्त्व अधिक आहे. मुंबई-विशाखापट्टणम (कल्याण रस्ता) आणि मुंबई-नागपूर असे दोन राष्ट्रीय महामार्ग व नगर-पुणे, नगर-मनमाड, नगर-सोलापूर, नगर-दौंड व नगर-औरंगाबाद असे तब्बल पाच राज्यमार्ग शहरासह जिल्हय़ातून जातात. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग नसला तरी नगर-मनमाड आणि नगर-सोलापूर या राज्यमार्गावरून देशातील दक्षिण-उत्तर अशी दिल्ली-हैदराबाद वाहतूक जिल्हय़ातूनच होते.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या या जाळय़ामुळे जिल्हय़ातून जाणारे सर्वच रस्ते कमालीचे रहदारीचे आहेत. मात्र मागच्या काही वर्षांत यातील एकही रस्ता असा राहिला नव्हती, की जेथे टोलवसुली होत नव्हती. सर्वच रस्त्यांची कामे खासगीकरणातून झाल्याने जिल्हय़ाला विशेषत: शहराला टोलवसुलीचा विळखा पडला होता. नगरहून कोठेही जायचे किंवा कोठूनही नगरला यायचे म्हटले, की ‘टोलधाड’ होतीच. ती आता पूर्ण बंद झाली आहे.
नगरहूनच सुरुवात
राज्य सरकारच्या रस्त्यांच्या ‘बीओटी’ला सुरुवातच कधीकाळी नगर जिल्हय़ातून झाली होती. राज्यात गेल्या वेळी युतीचे सरकार असताना तत्कालीन राज्य सरकारने हे धोरण स्वीकारले होते. त्यातून काम झालेला राज्यातील पहिला रस्ता म्हणजे नगर-सोलापूर राज्यमार्गावरील नगर-करमाळा रस्ता. राज्यात याच रस्त्यावर पहिल्यांदा टोल सुरू झाला होता. त्यानंतर एकेक करीत शहरासह जिल्हय़ाला ‘टोळधाडी’चा विळखा पडला होता.
नगर-मुंबईलाही फायदा
पूर्ण टोलमुक्तीत पुणे जिल्हय़ातील शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील शिक्रापूर येथील टोलनाक्याचाही समावेश आहे. नगरकरांच्या दृष्टीने मुंबईसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. तेथील टोल पूर्णपणे बंद झाल्याने जलदगती मार्गापर्यंत (एक्सप्रेस वे) नगरकरांना आता टोल द्यावा लागणार नाही.