सप्टेंबर २०११ मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाचा मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या यादीत समावेश करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत मंगळवारी दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मोठा आवाका तसेच नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने गडचिरोली येथे सप्टेंबर २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. स्थापना होऊन तीन वर्षे झाले तरी या विद्यापीठाचा समावेश मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या यादीत झालेला नाही. या विद्यापीठाला मान्यता द्यावी, अशी विनंती ५ नोव्हेंबर २०१२ च्या पत्रान्वये विद्यापीठ अनुदान आयोगास करण्यात आली होती. या विद्यापीठाला प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन, मुलांमुलींसाठी वसतीगृह नाही. तसेच पदव्युत्तर विभागासाठी आवश्यक असलेली शिक्षकांची पदे भरलेली नाहीत. या त्रुटी पूर्ण करण्याचे विद्यापीठ आयोगाने कळवले आहे.
त्यानुसार विद्यापीठातील ५ पदव्युत्तर विभागासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषाप्रमाणे आवश्यक असलेली ३५ शिक्षकीय पदे मंजूर करण्यात आली आहे. तसेच मुलांमुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम सुरू असून प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन व शैक्षणिक विभागांच्या इमारतींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही तावडे यांनी सभागृहाला सांगितले. गोंडवाना विद्यापीठाचा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या यादीत समावेश करण्याबाबत शासन काय कार्यवाही करीत आहे, असा प्रश्न डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे,संजय दत्त, भाई जगताप यांनी उपस्थित केला होता.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६७ हजार ५९६ शाळांपैकी  ६५५ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मुलांकरिता व ७५६ शाळांमध्ये मुलांकरिता स्वच्छतागृहे नाहीत. ७१६ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सदर शाळेत स्वच्छता गृहाची बांधकामे सुरू करण्यात आलेली आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा नसलेल्या शाळांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी बांधकामे करण्यात येत असल्याची माहितीही तावडे यांनी शरद रणपिसे, भाई जगताप, संजय दत्त यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.