गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरमधील टोलविरोधी कृती समितीने दिलेल्या लढ्याला अखेर यश आले असून, कोल्हापूरमधील टोल रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. या संदर्भातील सविस्तर निवेदन सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे कोल्हापुरात आनंदाचे वातावरण आहे.
आयआरबी कंपनीने सुरू केलेला टोल रद्द करावा, यासाठी गेली पाच वर्षे टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू होते. तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पाकलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुनर्मूल्यांकन समिती नेमून त्यानंतर व्यापक बैठक घेऊन टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याचवेळी तात्पुरती तीन महिन्यांसाठी टोल वसुलीला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना टोल रद्द करण्याची घोषणा फडवणीस यांनी विधानसभेत केले. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज संपताना त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली.