सूडबुद्धीने काम करण्याची आमची प्रथा नाही, असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरूद्ध करण्यात येत असलेली कारवाई पूर्णपणे व्यक्तीनिरपेक्ष आणि कोणताही आकस न ठेवता होत असल्याचे स्पष्ट केले.
भुजबळ यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना ही कारवाई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असून, त्यात सरकार कोणताही हस्तक्षेप करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय बेरीज वजाबाकी करण्यासाठी आमचे सरकार सरकारी यंत्रणेचा वापर कधीही करणार नाही. काही विशिष्ठ तक्रारी असतील, तर शासन नियमानुसार कारवाई करणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. मात्र, आम्ही सूडबुद्धीने कोणतीही कारवाई करीत नाही आणि आमची तशी प्रथा नाहीं,असे त्यांनी स्पष्ट केले.