सिंचन क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राचा देशपातळीवर शेवटून दुसरा क्रमांक लागत असल्याने गेली १५ वष्रे सत्ता भोगणाऱ्यांचेच हे पाप असल्याची टीका केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगलीत झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली. केंद्रीय कृषी खाते सांभाळणाऱ्यांना राज्याचा कृषी विकास का करता आला नाही, असा सवालही त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केला.
भाजपा कार्यकर्त्यांचा आज भावे नाटय़गृहात मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खा. संजयकाका पाटील, जिल्ह्यातील भाजपाचे आ. सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना गडकरी म्हणाले की, गेली ६० वष्रे सत्ता भोगणारी काँग्रेसची मंडळी एक वर्षांचा हिशोब मागत आहेत. मात्र महाराष्ट्र सिंचन विकासात देश पातळीवर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. सत्ता हाती असताना असे का? राज्यातील कृषी विकास दर उणे असून केंद्रीय कृषी खात्याचा कार्यभार हाती असताना विकास का करू शकले नाहीत असा सवाल त्यांनी केला.
राज्यात येत्या ५ वर्षांत रस्ते बांधणीसाठी सव्वा लाख कोटी रूपये खर्च करण्यात येणार असून प्रमुख रस्ते राष्ट्रीय महामार्गातून करण्यात येणार आहेत. तसेच वाढते रस्ते अपघात लक्षात घेउन जलमार्गातील प्रवासी वाहतुकीला चालना देण्यात येणार आहे. रस्त्यावर आणि पाण्यामध्ये चालणारी मोटार तयार करण्यासाठी कोचीन येथे प्रयत्न सुरू असून यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहेच, पण त्याचबरोबर हा प्रवासही स्वस्तात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय भाष्य करीत असताना गडकरी म्हणाले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी सत्ता असताना विकास करू शकले नाहीत, मात्र एका वर्षांत विकासाचा हिशोब मागण्याचा त्यांना कोणताही अधिकार पोहोचत नाही.