रणजित राणे क्रीडा व सामाजिक मंडळ आवास यांच्या वतीने येत्या २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आवास इथे प्रभाकर राणे क्रीडा नगरीत होणाऱ्या या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची मान्यता असणार आहे, अशी माहिती रणजित राणे क्रीडा व सामाजिक मंडळाचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहता यावा आणि तो शिकता यावा यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील १६ पुरुष संघ तर १२ महिला व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत. यात एअर इंडिया, बीपीसीएल, महिंद्रा आणि महिंद्रा, सेंट्रल रेल्वे, युनियन बँक, देना बँक, नेव्ही, बँक ऑफ इंडिया, वेस्टर्न रेल्वे, हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई पोलीस, रायगड पोलीस यांसारख्या संघांचा समावेष असणार आहे.
  स्पर्धेतील विजेत्या पुरुष व महिला संघांस प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तर उपविजेत्या संघास ७५ हजारांचे तर तृतीय संघास २५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. या शिवाय उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूंनाही १० हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत. तर सवरेत्कृष्ट पुरुष खेळाडूला एफझेड मोटर सायकल, तर महिला गटातील सवरेत्कृष्ट खेळाडूला होंडा अॅक्टिवा गाडी दिली जाणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे ऊर्जामंत्री राजेश टोपे तर समारोपाला जलसंपदामंत्री सुनील तटकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती अभिजीत राणे यांनी दिली आहे.