जिल्हा जलतरण संघटना, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व मिलके जलतरण-पर्यटन प्रसारक अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र हौशी जलतरण असोसिएशनच्या मान्यतेने येत्या रविवारी (२८ एप्रिल) चौथ्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जि. जलतरण संघटनेचे अध्यक्ष शंकर मिलके व सेक्रेटरी मनीषा बेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार बाळ माने व उद्योजक प्रसन्न आंबुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी ७ वा. या स्पर्धाचा भाटले समुद्र येथे प्रमुख शुभारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला आनंद शिरधनकर, संजय बेडगे, मोहन सातव, गोपाळ बेंगलोरकर, सागर पाटील आदी उपस्थित होते. राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून गतवर्षी या स्पर्धेमध्ये ३७५ जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता, तर यावेळी सुमारे पांचशे स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा मिलके यांनी व्यक्त केली. एकूण २० गट पाडण्यात आले असून, त्यामध्ये १० मुलांचे आणि १० मुलींचे गट राहणार आहेत. ८ ते ५५ वर्षे वयोगटातील स्पर्धकांचा यामध्ये समावेश आहे, तर त्यापुढे खुला वयोगट ठेवण्यात आला आहे, असे मिलके यांनी सांगितले.
 शनिवारी (२७) सायंकाळी ५वा. येथील केतन मंगल कार्यालयामध्ये स्पर्धकांची माहिती घेण्यात येणार असून, याचवेळी स्पर्धेसंबंधीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विभागीय क्रीडा संचालक नरेंद्र देसाई, बंदर अधिकारी विनायक इंगळे, महाराष्ट्र हौशी जलतरण असोसिएशनचे सचिव किशोर वैद्य आदी उपस्थित राहणार आहेत. रविवारी दुपारी १ वाजता मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याचे सचिव मनीषा बेडगे यांनी सांगितले.