22 February 2019

News Flash

राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा सावंतवाडीत सुरू

४२वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सावंतवाडी जिमखाना मैदानावर प्रकाशझोतात सुरू झाली.

४२वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सावंतवाडी जिमखाना मैदानावर प्रकाशझोतात सुरू झाली. कुमार २५ तर कुमारी २२ राज्यस्तरीय संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सिंधुदुर्ग राज्य कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष व राज्याचे अर्थ, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा जिमखाना मैदानावर होत आहे.
जिमखाना मैदानावर २२ ते २५ नोव्हेंबर या चार दिवसीय स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज तर समारोप २५ नोव्हेंबर रोजी होईल. ४२वी कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सायंकाळी ६ ते रात्री १०वा. या काळात प्रकाशझोतात होत आहे.
या स्पर्धेसाठी राज्यातून कुमार गटाचे २५ तर कुमारी गटाचे २२ संघ दाखल झाले आहेत. या संघातून महाराष्ट्र संघ निवडला जाणार असल्याने स्पर्धा रंगतदार होणार आहे. साखळी पद्धतीने कबड्डी स्पर्धा खेळली जाईल.
या साखळी पद्धतीत सहा गट असतील तसेच प्रत्येक गटात चार टीम, साखळी पद्धतीने खेळ झाल्यावर बाद पद्धतीने फायनल खेळतील. या स्पर्धेतील खेळाडू २० वर्षांच्या खालील कुमार-कुमारी गट असणार आहे. या रंगतदार खेळातून महाराष्ट्र संघ निवडला जाईल. त्यामुळे चार दिवस खेळ रंगतदार होईल.
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह कै. विलास रांगणेकर क्रीडा नगरी आणि कबड्डी महर्षी बुवा साळवी या क्रीडानगरीत हे खेळ होतील. राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या नियोजनातून होणाऱ्या या स्पर्धेत राज्य कबड्डीचे अध्यक्ष किशोर पाटील, प्रभारी कार्यवाह संभाजी पाटील, दत्ता पातळीकर यांनी राज्य तर जिल्हा कबड्डीचे अ‍ॅड. अजित गोगटे, दिलीप रावराणे, रुजारीओ पिंटो, शशिकांत नेवगी, संजय पेडणेकर, दिनेश चव्हाण, मार्टीन आल्मेडा, तुषार साळगांवकर, शैलेश नाईक, अनिता सडवेलकर, अलीशा नाईक आदींनी नियोजन केले आहे.
राज्य कबड्डी स्पर्धेसाठी गॅलरी उभारून खेळ पाहण्याची सोय करण्यात आली आहे. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्य़ातून कबड्डीचे खेळाडू सावंतवाडीत दाखल झाले आहेत.
कुमार गटाच्या या स्पर्धा सावंतवाडीत आयोजन करून जिल्हा कबड्डी संघाचे अध्यक्ष आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कबड्डी खेळाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला फायदा होईल असे नगरसेवक संजय नाईक व शैलेश नाईक यांनी म्हटले आहे.

First Published on November 23, 2015 4:21 am

Web Title: state level kabaddi competition 6