पुढील वर्षी येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना प्रशासनाकडून हळूहळू वेग देण्यात येत असला तरी केंद्राकडून अद्याप एक रुपयाही निधी मिळाला नसल्याचे राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी निदर्शनास आणून दिले आहे. नाशिक विभागात पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान, लोकसभा निवडणूक आणि सिंहस्थ कामे यांचा आढावा घेण्यासाठी रविवारी येथील विभागीय कार्यालयात सहारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. विभागात तीन लाख ७७ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांपैकी दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्यात येणार असून लवकरात लवकर नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आणि महापालिका यांच्याकडून १८०० कोटींची कामे करण्यात येणार असून त्यांपैकी अनेक कामांना सुरुवातही झाली आहे. केंद्राकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असला तरी अद्याप एक रुपयाही मिळाला नसल्याचे सहारिया यांनी सांगितले. साधुग्रामसाठी ४७ एकर जागा महापालिका आणि १६५ एकर जागा शासन ूसंपादित करणार आहे. याशिवाय शाही मिरवणूक मार्गाचे विस्तारीकरण, गोदावरीत स्नानासाठी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ठिकठिकाणी घाटांचे बांधकाम अशी कामे केली जाणार आहेत. पुढील वर्षी पावसाळ्यातच सिंहस्थ येत असल्याने त्याआधी येणाऱ्या पावसाळ्याकडे सिंहस्थातील कामांच्या तयारीच्या दृष्टीने एक चाचणी म्हणूनच प्रशासन पाहणार असल्याचेही सहारिया यांनी नमूद केले.
नुकत्याच झालेल्या गारपीट आणि पावसामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांत तीन लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असले तरी शासकीय निकषांप्रमाणे शेतकऱ्याचे दोन हेक्टर क्षेत्रच भरपाईसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने केवळ दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रासाठीच भरपाई दिली जाणार असल्याचेही सहारिया यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती देताना त्यांनी विभागात १९ हजार मतदान केंद्रे असून मतदारांची संख्या एक कोटी २७ लाखांपर्यंत असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी ४० हजार निवडणूक अधिकारी, १७ हजार केंद्र निरीक्षक नेमले जाणार असून ती प्रक्रिया सुरू आहे. शहरी भागात मतदानाचे होणारे कमी प्रमाण रोखण्यासाठी आणि टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत असल्याची माहितीही सहारिया यांनी दिली.