|| विजय राऊत/कासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर:  गुजरात राज्यात रोजगारासाठी (रोजंदारी) गेलेल्या शेकडो कुटुंबाचे मध्यरात्री नंतर महाराष्ट्र- गुजरात हद्दीवरील अच्छाड नाक्यावर आगमन झाले. या स्थलांतरित मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीनंतर पायी करणाऱ्या मजूरांची वाहनाने रवानगी आपापल्या गावाकडे करण्यात आली.

लॉकडाऊननंतर स्थलांतरित मजूरांची सुरु होती पायपीट याबाबत लोकसत्ता ऑनलाइन मधील वृतानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली आणि स्थलांतरित कुटुंबियांच्या पुनरागमनाची त्यांनी तयारी केली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने रोजगाराच्या शोधात गुजरात राज्यात गेलेले पालघरमधील आदिवासी स्थलांतरित मजूर अडकले होते. लॉकडाऊनमुळे कोणतेही साधन नसल्याने या मजूरांना  पायपीट करत घराकडे परतावे लागत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तातडीने महाराष्ट्र आणि गुजरातच्या हद्दीवरील अच्छाड नाक्यावर गुजरातमधून परतणाऱ्या या स्थलांतरित मजूरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना वाहनाने घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था  केली. गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत ही कार्यवाही सुरु होती. रात्रीचे दोन वाजून गेले असताना सुमारे ४०० ते ५०० मजूर अच्छाड नाक्यावर पोहचलेले असून त्यांची वाहनाने घरी रवानगी करण्याचे शर्थीचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहेत. गुजरात राज्यातून अजूनही असंख्य मजूर आपल्या मुळाबाळांसह कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करत येत असून एकीकडे जमावबंदीचा आदेश असताना मात्र अच्छाड नाक्यावर शेकडोंच्या संख्येने मजूर पोहचल्याने जत्रेचे स्वरूप आले आहे.  रोजगारासाठी   गुजरात राज्यात गेलेले हे मजूर लॉकडाऊन झाल्यामुळे संबंधित मालकांनी व्यवसाय बंद केल्याने  हाताला काम नाही आणि परतण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने आपल्या मुलाबाळांसह घराच्या ओढीने उन्हातान्हात पायपीट करत उपाशीपोटी  परतत असल्याने  संबंधित व्यवसाय मालकानेही त्यांच्यावर अन्याय केल्याचे दिसत आहे.

पालघर जिल्ह्यात रोजगाराची संधी नसल्याने दरवर्षी जिल्ह्याच्या आदिवासी भागातील ६० ते ७० टक्के मजूर आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होत असतात. मुंबई, ठाणे, वसईसह गुजरात राज्यात मोठ्याप्रमाणावर हे मजूर कामाच्या शोधात जात असतात. यावर्षीही या स्थलांतरित झालेल्या मजूरांवर लॉकडाऊनमुळे परतावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे हे मजूर ठिकठिकाणी अडकून पडले असून हाताला काम नाही आणि त्यात कोरोनाच्या भीतीने आपलं घर गाठण्याच्या ओढीने  प्रवासाचे कोणतेही साधन नसताना हे मजूर  पायपीट करत निघाले आहेत. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अच्छाड नाक्यावर दाखल झाले असून या ५०० हून अधिक संख्येने असलेल्या मजूरांची वैद्यकीय तपासणी करून वाहनाने घरी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बाईट: कुमार कोंडारे, महसूल अधिकारी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State of gujarat workers work lockdown loksatta online news akp
First published on: 26-03-2020 at 03:29 IST