मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील १८८ इमारतींसह शहरातील अनेक वास्तूंचा पुरातन वास्तू(हेरिटेज)यादीत समावेश करणाऱ्या हेरिटेज समितीचीच सखोल चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी विधानसभेत केली. तसेच या हेरिटेजच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यासमवेत मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, नितीन सरदेसाई, मधु चव्हाण आदींच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात सामंत यांनी ही घोषणा केली. शिवाजी पार्क परिसरातील इमारती पूर्वी हेरिटेजमध्ये नव्हत्या, मात्र आता हा परिसर हेरिटेजमध्ये कसा आला, तसेच काही जुन्या इमारतींचा पुनर्विकास झालेला असतानाही त्या पुरातन म्हणून कशा जाहीर करण्यात आल्या याची सखोल चौकशी केली जाईल.
 तसेच उच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयानुसार ३१ जुलै २०१२ पूर्वी म्हणजेच हेरिटेजची यादी जाहीर होण्यापूर्वी ज्या इमारतींना विकास परवानगी दिली आहे, त्यांना त्यांची कामे सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश महापालिकेला दिले जातील, तसेच हेरिटेजबाबत नेमण्यात आलेल्या पुनर्विलोकन समितीचा अहवाल आल्यानंत शिवाजी पार्क तसेच मुंबईतील नागरिकांना त्रास होणार नाही असा विचार करून हेरिटजेची यादी अंतिम केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेरिटेजच्या यादीत रहिवाशांच्या इमारतींचा समावेश करताना समितीने त्या इमारतींच्या स्थितीची पाहणी न करताच अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या इमारतींचा समावेश केला आहे. यात मोठा घोटाळा झाला असून वरळी परिसरातील टोलेजंग इमारतींच्या हितासाठी शिवाजी पार्क परिसतील इमारतींच्या पुनर्विकासावर हेरिटेजच्या माध्यमातून र्निबध आणण्यात आल्याचा आरोप सुभाष देसाई यांनी केला, तर ताज महाल, रिझर्व बँक अशा पुरातन वास्तुंना या यादीतून कसे वगळले अशी विचारणा नितीन सरदेसाई यांनी केली.

शिवाजी पार्क परिसरातील इमारती पूर्वी हेरिटेजमध्ये नव्हत्या, मात्र आता हा परिसर हेरिटेजमध्ये कसा आला, तसेच काही इमारतींचा पुनर्विकास झालेला असतानाही त्या पुरातन म्हणून कशा जाहीर करण्यात आल्या याची चौकशी केली जाईल.