05 March 2021

News Flash

लालपरीचा प्रवास महागला, तिकीटदरात १८ टक्क्यांनी वाढ

डिझेल करमाफी मिळाल्यास दरवाढीचा फेरविचार – मंत्री दिवाकर रावते

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्राच्या गावखेड्यांमध्ये पोहचलेल्या लालपरीचा प्रवास येत्या १५ जूनपासून महागणार आहे. येत्या १५ जूनपासून एसटीच्या तिकीटदरांमध्ये तब्बल १८ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. डिझेलचे वाढलेले दर आणि एसटी कामगारांना नुकतीच देण्यात आलेली पगारवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. याचकारणास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाने सांगितलं आहे.

याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही ५ रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असे एसटी महामंडळाने कळविले आहे.

डिझेल करमाफी मिळाल्यास दरवाढीचा फेरविचार – मंत्री दिवाकर रावते

तिकीट दरवाढीबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, “इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी साधारण ४६० कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसेच कामगारांसाठी नुकतीच ४,८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीटदरात ३० टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव महामंडळाने दिला होता. पण प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये यासाठी ही दरवाढ ३० टक्क्यांऐवजी फक्त १८ टक्के इतका करण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.” हा निर्णयही नाइलाजास्तव घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्य शासनाने डिझेलवरील विविध कर माफ करावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांसह वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल, असे संकेत दिवाकर रावते यांनी दिले आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 7:28 pm

Web Title: state transport corporation increase fare rate of st buses by 18 percent rural population to affect by the decision
टॅग : St
Next Stories
1 शिवसेना-भाजपा युती संदर्भात अमित शहांनी केले मोठे विधान
2 अमित शहांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये माधुरी दीक्षित – राज यांचा व्यंगचित्रातून निशाणा
3 सख्ख्या भावासह भावजयीवर हल्ला, मारहाण करून सोने-चांदीची लूट
Just Now!
X